साताऱ्यात पुन्हा धुवांधार, कोयना धरणात ८४.३२ टीएमसी साठा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 01:07 PM2024-07-29T13:07:24+5:302024-07-29T13:08:17+5:30

शेंदूरजणे, तपाेळ्यात पुलांना भगदाड

Heavy rain again in Satara district on Sunday, 84.32 TMC storage in Koyna Dam | साताऱ्यात पुन्हा धुवांधार, कोयना धरणात ८४.३२ टीएमसी साठा

साताऱ्यात पुन्हा धुवांधार, कोयना धरणात ८४.३२ टीएमसी साठा

सातारा : जिल्ह्यात रविवारी पुन्हा पावसाने जोर धरला असून, पश्चिमेकडील तालुक्यात धुवांधार पाऊस झाला. यामुळे धरणांमध्येही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोयना धरणातून ३२ हजार क्युसेक विसर्ग सुरू असून, सध्या ८४.३२ टीएमसी पाणीसाठा आहे. कण्हेर आणि वीर धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोयना नदीवरील मूळगाव पूल पाण्याखाली गेला आहे, तर सातारा तालुक्यातील हामदाबाज आणि म्हसवे येथील पूलही पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सातारा शहर व परिसरात सकाळपासून जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाण्याची पुन्हा तळी झाली. समर्थनगरमध्ये अपार्टमेंटच्या तळमजल्यातील घरात पाणी गेल्यामुळे लोकांना तात्पुरते स्थलांतरित व्हावे लागले. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३७ हजार ४६० आवक होत आहे. धरणाच्या वक्र दरवाजातून ३० हजार क्युसेक आणि पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक असा ३२ हजार १०० क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होत असून, कोयना नदीवरील मूळगाव पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली.

इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरी कोसळत आहेत. वीर धरणातून सांडव्याद्वारे निरा नदीपात्रात ४ हजार ६३७ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. कण्हेर धरणातून वेण्णा नदीमध्ये पाणी सोडण्यात आल्यामुळे म्हसवे आणि हामदाबाज येथील पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता वाढली आहे. या पुलावरून कोणीही वाहतूक करू नये, अशा सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. रविवारी संध्याकाळी ४ वाजता कण्हेर धरणाचा विसर्ग ५ हजार क्युसेक, तर पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे पुढे ७ हजार क्युसेक करण्यात आला.

शेंदूरजणे, तपाेळ्यात पुलांना भगदाड

१) धोम डाव्या कालव्यावरील खानापूर ते शेंदुरजणे यांना जोडणाऱ्या पुलाचा काही भाग ढासळला आहे. पुलावरील वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली असून, कालव्यातून सुरू असलेला शंभर क्यूसेक विसर्गही बंद करण्यात आला आहे. या पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
२) तपोळ भागातही पुलाला अचानक भगदाड पडले. यात चारचाकी गाडी अर्धी घुसून निम्म्यावरच अडकून पडली. गावातील युवकांनी वेळीच मदतकार्य केले. सुदैवाने आतील दोन प्रवासी वाचले.

Web Title: Heavy rain again in Satara district on Sunday, 84.32 TMC storage in Koyna Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.