सातारा शहरात पुन्हा जोर‘धार’!, सर्वत्र पाणीच पाणी; नागरिकांची धावपळ, विक्रेत्यांचे हाल
By नितीन काळेल | Published: August 19, 2024 07:07 PM2024-08-19T19:07:56+5:302024-08-19T19:08:13+5:30
खरीप हंगामातील पिकांना फायदा
सातारा : सातारा शहरासह परिसराला सोमवारी सायंकाळच्या सुमारास पुन्हा जोरदार पावसाने झोडपून काढले. यामुळे सर्वत्र पाण्याचे लोट वाहत होते. तर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनाही धावपळ करावी लागली. तसेच विक्रेत्यांचेही हाल झाले.
शहरासह तालुक्यात आॅगस्ट महिना सुरू झाल्यापासून पाऊस कमी होत गेला. त्यातच मागणी आठवड्यात पावसाची पूर्ण दडी होती. पण, तीन दिवसांपासून वातावरण बदलले आहे. शनिवारी आठवड्यानंतर शहरात पाऊस झाला. यामुळे सखल भागात पाणी साचून राहिले होते. तसेच रस्त्याचीही वाट लागली. तर रविवारी दिवसभर उकडत होते. त्यामुळे दुपारनंतर पाऊस होईल अशी चिन्हे होते. मात्र, पावसाने पाठ फिरवली. तरीही सोमवारी जोरदार पाऊस झाला.
शहरासह परिसरात सोमवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. त्यानंतर दुपारी चारपासून आकाशात काळे ढग जमू लागले. तसेच अंधारुनही आले होते. त्यामुळे पाऊस पडणार असा अंदाज होता. सायंकाळी सवा सहाच्या सुमारास टपोरे थेंब पडू लागले. त्यानंतर पावसाचा जोर वाढत गेला. बघता-बघता जोरदार पावसाला सुरूवात झाली. क्षणात रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहू लागल्याने विक्रेत्यांचे हाल झाले. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.
पूर्व भागात पावसाला सुरूवात..
जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव आदी दुष्काळी तालुक्यात आॅगस्टच्या मध्यापासूनच पाऊस पडत असतो. यामध्ये सप्टेंबर, आॅक्टोबरमधील परतीचा पाऊस हा महत्वाचा ठरतो. सध्याही पूर्व भागात पाऊस हाेत आहे. मागील तीन दिवसांत तर अनेक गावांमध्ये दमदार पाऊस झाल्याचे दिसून आले आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदाच होणार आहे. तर सोमवारी दिवसभरात पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात तुरळक प्रमाणात पाऊस पडला. तरीही कोयना धरणात आवक वाढल्याने पाणीसाठा वाढू लागला आहे