सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली, पत्रे उडाले; सर्वाधिक नुकसान पाटण तालुक्यात
By नितीन काळेल | Published: May 17, 2024 06:37 PM2024-05-17T18:37:25+5:302024-05-17T18:38:46+5:30
अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली होती
सातारा : जिल्ह्यात वादळासह वळीवाचा पाऊस होत असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. मागील दीड महिन्यात पाऊस आणि वादळामुळे ११४ घरांचे नुकसान झाले आहे तर ४ शाळांनाही फटका बसलाय. कोंबड्यांसह पशुधनही मृत झाले आहे. यामुळे दीड महिन्यात पाऊस आणि वाऱ्यामुळे अंदाजित ४७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक नुकसान पाटण तालुक्यात आहे.
दरवर्षीच उन्हाळ्यात वळीवाचा पाऊस होतो. जोरदार वादळी वारेही वाहतात. त्यातच विजाही कोसळतात. जिल्ह्यात सध्या वळीवाचा पाऊस पडू लागला आहे. त्याचबरोबर जोरदार वारेही सुटत आहे. यामुळे नुकसानाच्या घटना घडू लागल्या आहेत. मागील आठवड्यात तर पावसाचा पाटण आणि कऱ्हाड तालुक्याला मोठा फटका बसला. यामध्ये नुकसानच अधिक झाले आहे. पाटण तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळामुळे अनेक गावांत नुकसान झाले. काळगाव परिसरात घरावरील पत्रे उडून गेले. यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य भिजले. तर एका ठिकाणी कारवरही झाड पडले. यामुळे वाहनाचे नुकसान झाले.
तालुक्यातील मालदन, तळमावले, गलमेवाडी, मानेगाव येथे मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली होती. वीज वाहिन्यावरही झाडे पडली. यामुळे वीजपुरवठा खंडित हाेण्याबरोबरच महावितरणचे नुकसान झाले. सोमवारी तर कऱ्हाड तालुक्यातील मसूर परिसरात वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. तर विजेच्या तारांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. या पावसामुळे आडसाली उसासह फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून दररोज कोठे ना कोठे पाऊस पडत आहे. याचा फायदा होण्याऐवजी तोटाच अधिक झाला आहे. घरांचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर फळबागांना मोठा फटका बसत आहे. वीज पडण्यानेही आठवड्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात १ एप्रिलपासून १५ मेपर्यंत पाऊस आणि वादळाने ४७ लाख १२ हजार रुपयांचे अंदाजित नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
जनावरांच्या गोठ्यांनाही फटका..
जिल्ह्यात मागील दीड महिन्यात पाऊस तसेच वादळाने शेती पिके तसेच शेतजमिनीचे नुकसान झाल्याच्या घटना घडलेल्या नाहीत. पण ९ घरांचे पत्रे उडून अंशत: नुकसान झाले आहे तर ३ गोठे आणि शेडलाही वादळाचा फटका बसलाय. त्याचबरोबर १०५ घरे, जिल्हा परिषदेच्या ४ शाळा, एका वाहनाचे नुकसान झाले. तसेच १० कोंबड्या, ६ जनावरेही मृत झाली आहेत. तर दोन महिन्यांत वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे.