साताऱ्यात दमदार पाऊस सुरूच, कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ 

By नितीन काळेल | Published: July 20, 2024 06:42 PM2024-07-20T18:42:27+5:302024-07-20T18:43:30+5:30

नवजाला १०० तर कोयनेला ८५ मिलीमीटर पर्जन्यमान 

Heavy rain continues in Satara, rapid increase in water storage in Koyna Dam  | साताऱ्यात दमदार पाऊस सुरूच, कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ 

साताऱ्यात दमदार पाऊस सुरूच, कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस होत असून २४ तासांत नवजा येथे १०० तर कोयनानगरला ८५ मिलीमीटरची नोंद झाली. तसेच महाबळेश्वर तालुक्यातही जोरदार पाऊस होत आहे. यामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने ५१ टीएमसीचा टप्पा गाठला आहे. त्याचबरोबर इतर प्रमुख धरणक्षेत्रातही पाऊस सुरूच आहे.

जिल्ह्यात पाऊस वाढू लागला आहे. विशेष करुन दोन दिवसांपासून पश्चिम भागात दमदार पाऊस होत आहे. पाटण, जावळी, महाबळेश्वर आणि सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात संततधार आहे. यामुळे रानावनातून पाणी खळाळून वाहत आहे. त्याचबरोबर धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी धरणक्षेत्राही पाऊस सुरू आहे. या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत चालली आहे. कोयना धरणक्षेत्रात तर संततधार सुरू आहे. दोन दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे. यामुळे धरणातील आवक वाढली आहे. परिणामी धरणसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.

शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यातील नवजा येथे १०० मिलीमीटर पाऊस पडला. तर जूनपासून आतापर्यंत नवजाला २ हजार ७२० मिलमीटर पर्जन्यमान झाले. यामुळे नवजाच्या पावसाची तीन हजार मिलीमीटरकडे वाटचाल सुरू झाली आहे. कोयना येथे आतापर्यंत २ हजार २८६ मिलीमीटर पाऊस झाला. महाबळेश्वरलाही २४ तासांत ९५ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर आतापर्यंत २ हजार १०१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात सुमारे ४३ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात ५०.७६ टीएमसी पाणीसाठा झालेला. त्यामुळे कोयना धरण अर्धे भरल्यात जमा आहे. तरीही अजून धरण पूर्ण भरण्यासाठी ५४ टीएमसी पाण्याची गरज आहे.

साताऱ्यात जोरदार सरी..

सातारा शहरातही दोन दिवसांपासून चांगलाच पाऊस होत आहे. शनिवारी सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झालेले. विशेषत: करुन शहराच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक राहत आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ हाेत चालली आहे.

Web Title: Heavy rain continues in Satara, rapid increase in water storage in Koyna Dam 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.