Satara News: कोयना, नवजा धरण परिसरात पावसाचा जोर; पाणीसाठ्यात वाढ, महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पाऊस
By नितीन काळेल | Published: June 29, 2023 12:10 PM2023-06-29T12:10:40+5:302023-06-29T12:12:21+5:30
खरीप पेरण्यांना वेग
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कोयना, नवजाला पाच दिवसांपासून पाऊस सुरू असून महाबळेश्वरला २४ तासांत ११८ मिलीमीटरची पर्जन्यमानाची नोंद झाली. यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. तर पूर्व भागात खरीप हंगामातील पेरणीसाठी पावसाची आवश्यकता आहे.
जिल्ह्यात दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस दाखल होतो. पण, यंदा मान्सून येण्यास उशिर लागला. तर २४ जूननंतरचा मान्सूनचा पाऊस सक्रीय झाला आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडू लागलाय. विशेषत: करुन पश्चिम भागातील कोयना, नवजा, तापोळा, बामणोली, महाबळेबश्वरसह कांदाटी खोऱ्यात सतत पाऊस पडत आहे. यामुळे ओढे, नाले भरुन वाहत आहेत. तसेच भात खाचरे भरुन पाणी वाहत आहे. तर पश्चिम भागातीलच कोयना, धोम, बलकवडी, तारळी, कण्हेर, उरमोडी आदी प्रमुख धरण परिसरातही पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठाही हळूहळू वाढू लागला आहे.
गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ११८ मिलीमीटर पाऊस पडला. तर एक जूनपासून ५९५ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. तर काेयनानगर येथे सकाळपर्यंत ४९ आणि नवजाला ७४ मिलीमीटर पाऊस पडला. जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे फक्त ३२१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तरीही धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्याने कोयनेत पाण्याची आवक बऱ्यापैकी होत आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढू लागलाय. तर गुरुवारी सकाळच्या सुमारास धरणात ११.१६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्याचबरोबर धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.
दरम्यान, जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत असलातरी पूर्वेकडे उघडझाप सुरू आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यातील खरीप पेरण्यांना वेग येण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे. सध्या येथील बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.