साताऱ्याला पावसाने झोडपले, ढगांच्या गडगडाटासह चौथ्या दिवशीही हजेरी
By प्रशांत कोळी | Published: September 7, 2022 06:23 PM2022-09-07T18:23:49+5:302022-09-07T18:24:19+5:30
गणेशोत्सवाच्या उत्साहावर पाणी फेरले
सातारा : सातारा शहर आणि परिसराला सलग चौथ्या दिवशी पावसाने झोडपून काढले. सायंकाळी पाचच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात सुरू झालेला पाऊस नंतर धो-धो कोसळत होता. यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहावर पुन्हा पाणी फेरले. दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे.
सातारा शहरात मागील चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. दुपारपर्यंत तीव्र उकाडा जाणवतो. त्यानंतर आकाशात ढग दाटून येतात आणि परिसर काळोखून जातो. मग, हळूहळू पावसाला सुरुवात होत जाते. साताऱ्यात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही क्षणातच पावसाने झोडपणे सुरू केले.
यामुळे सातारकर नागरिकांची धावपळ उडाली. तर शाळेतून घरी जाणाऱ्या मुलांनाही निवारा शोधावा लागला. शहरातील रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते, तर पावसामुळे वाहनधारकांना लाईट सुरू करूनच पुढे जावे लागत होते. हा पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. त्यामुळे गणेशोत्सवासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची निराशा झाली.
दरम्यान, बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला ३, नवजा येथे २ आणि महाबळेश्वरला १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात ९९.९५ टीएमसी साठा झाला होता. धरणातील विसर्ग बंद आहे.