सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर; कोयना धरणात २४ तासांत साडेतीन टीएमसी'ने वाढ, पाणीसाठा पोहचला..

By नितीन काळेल | Published: August 26, 2024 07:03 PM2024-08-26T19:03:16+5:302024-08-26T19:03:51+5:30

गतवर्षीची पाणीपातळी मागे टाकली

Heavy rain in Satara district; In 24 hours Koyna Dam has increased by three and a half TMC | सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर; कोयना धरणात २४ तासांत साडेतीन टीएमसी'ने वाढ, पाणीसाठा पोहचला..

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर; कोयना धरणात २४ तासांत साडेतीन टीएमसी'ने वाढ, पाणीसाठा पोहचला..

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर असून, २४ तासांत नवजा येथे १५२, कोयनेला १४६ आणि महाबळेश्वरमध्ये १४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली असून, सोमवारी सकाळच्या सुमारास पाणीसाठा ९६ टीएमसीजवळ पोहोचला. तसेच धरण ९१ टक्के भरले. परिणामी, धरणाने गतवर्षीची पाणीपातळी मागे टाकली आहे. तर धरणात २४ तासांत सुमारे साडेतीन टीएमसी साठा वाढला आहे.

जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाला सुरुवात झाली. जून आणि जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिले. यामुळे खरीप हंगामातील पेरणी वेळेवर सुरू होऊन समाप्त झाली. यामध्ये जुलै महिन्याच्या मध्यानंतर पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली, तापोळासह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात अतिवृष्टी होती. सलग १२ दिवस पावसाने डोळा उघडला नव्हता. त्यामुळे तळ गाठलेल्या कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळीसह उरमोडी या प्रमुख प्रकल्पांत मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला. त्यातच या प्रमुख प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता १४८ टीएमसीवर आहे. सध्या ही प्रमुख धरणे ९० टक्क्यांवर भरली आहेत. त्यातच मागील तीन दिवसांपासून पावसाचा पुन्हा जोर वाढला असल्याने धरणे भरण्याच्या स्थितीत आहेत.

सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील आकडेवारीनुसार जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतशिवारात, भात खाचरात पाणी साचून राहिले आहे. तर २४ तासांत नवजा येथे १५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एक जूनपासून आतापर्यंत नवजा येथे तब्बल ५ हजार ४९१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच कोयनेला ४ हजार ६३४ आणि महाबळेश्वर येथे ५ हजार २६५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. त्याचबरोबर कोयना धरणात २४ तासांत ३.४१ टीएमसी पाणीसाठा वाढला. सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात ९५.७९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ९१.०१ टक्केवारी साठ्याची आहे. आता धरण भरण्यासाठी ९ टीएमसीहून अधिक पाण्याची गरज आहे. तर धरणातील विसर्ग बंदच आहे.

पाऊस वाढला; धरणांतून पुन्हा विसर्ग..

जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे प्रमुख धरणांतून पुन्हा पाणी सोडणे सुरू झाले आहे. परिणामी, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सातारा तालुक्यातील कण्हेर धरणाच्या वीज गृहातून ४००, तर दरवाजातून दोन हजार क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे वेण्णा नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पातूनही विसर्ग सुरू करण्याबाबत नियोजन झाले आहे. वाई तालुक्यातील बलकवडी धरणातही पावसामुळे आवक वाढली. त्यामुळे रविवारी रात्रीपासूनच विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी धोम धरणात जात असल्यामुळे कृष्णा नदीच्या काठावरील बलकवडी, परतवडी, दह्याट, बोरगावसह अन्य गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयनेत गतवर्षी ९४ टीएमसी साठा..

जिल्ह्यात गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाले होते. वार्षिक सरासरीच्या ७० टक्क्यांच्या आसपासच पाऊस होता. यामुळे अनेक प्रमुख धरणे भरली नव्हती. यामध्ये कोयना धरणाचाही समावेश आहे. कोयनेत गतवर्षी ९४ टीएमसीवर साठा झाला होता. हा टप्पा आता पार झालेला आहे. पावसाचा जाेर पाहता, ऑगस्टअखेर धरण भरू शकते, असा अंदाज आहे.

Web Title: Heavy rain in Satara district; In 24 hours Koyna Dam has increased by three and a half TMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.