सातारा जिल्ह्यात पूर्वेकडे पावसाचे थैमान; ताली फुटल्या, रस्तेही गेले वाहून! 

By नितीन काळेल | Published: June 18, 2024 06:54 PM2024-06-18T18:54:04+5:302024-06-18T18:54:23+5:30

जिल्ह्यात विरोधाभास : पश्चिम भागात उघडीप, काही ठिकाणी तुरळक 

Heavy rain in Satara district in east; tali broke out, roads were washed away | सातारा जिल्ह्यात पूर्वेकडे पावसाचे थैमान; ताली फुटल्या, रस्तेही गेले वाहून! 

सातारा जिल्ह्यात पूर्वेकडे पावसाचे थैमान; ताली फुटल्या, रस्तेही गेले वाहून! 

सातारा : जिल्ह्याचा पश्चिम भाग पावसाचा असलातरी सध्या उघडीप आहे. पण, पूर्व दुष्काळी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस होत असल्याने अनेक गावातील ताली फुटल्या, रस्ते वाहून गेलेत. ओढेही खळाळून वाहू लागले आहेत. त्यातच मागील १२ दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू असल्याने नुकसानीच्या घटनाही घडू लागल्या आहेत.

जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे पावसाचा. जून ते सप्टेंबरदरम्यान या भागात जोरदार पाऊस पडतो. महाबळेश्वर, कोयना, नवजा या परिसरात तर पाच हजार मिलीमीटरवर पर्जन्यमान होते. तसेच कास, बामणोली, तापोळा भागातही जोरदार वृष्टी होते. याचा फायदा कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी आदी धरणांना होतो. तसेच जून महिन्यापासूनच पश्चिम भागात पाऊस सुरू होतो.

पण, यंदा मात्र उलट स्थिती जाणवत आहे. कारण, जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल होऊन १५ दिवस होत आले आहेत. सुरुवातीला पूर्व तसेच पश्चिम भागात चांगला पाऊस पडला. पण, मागील पाच दिवसांपासून पश्चिम भागात पावसाची उघडीप आहे. कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिसरात तुरळक स्वरुपात पाऊस पडत आहे. त्यामुळे प्रमुख धरणात अजून पाण्याची आवक सुरू झालेली नाही. तर दुसरीकडे माण, खटाव, फलटण या तालुक्यात धुवाॅंधार सुरू आहे.

दुष्काळी तालुक्यात मान्सून दाखल झाल्यापासून पाऊस पडत आहे. अजुनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. दररोज कोणत्या ना कोणत्या भागात ढगफुटीसदृश्य पाऊस होत आहे. त्यामुळे क्षणातच धो-धो पाणी वाहत आहे. या पाण्यामुळे तलावात चांगला पाणीसाठा झाला आहे. तसेच पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे ताली फुटल्या आहेत. रस्तेही वाहून गेलेत. यामुळे नुकसानीच्या घटना घडत आहेत. त्यातच आतापर्यंत दुष्काळी तालुक्यात जूनमधील उच्चांकी पावसाची नोंद झालेली आहे. परिणामी या पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीला खीळ बसली आहे. आता पाऊस थांबल्याशिवाय पेरणीला वेग येणार नाही, अशी स्थिती आहे.

कोयनेला पाऊस नाही, महाबळेश्वरला अवघा ३ मिलीमीटर..

पश्चिम भागात पावसाची तीन दिवसांपासून उघडीप आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला काहीही पाऊस झालेला नाही. तर नवजा येथे फक्त १ तर महाबळेश्वरला ३ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणात १४.८१ टीएमसी पाणीसाठा आहे. सातारा शहरात तर चार दिवसांपासून ढगाळ वातावरण राहत आहे. पाऊस मात्र पडत नाही.

Web Title: Heavy rain in Satara district in east; tali broke out, roads were washed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.