सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव; मेघगर्जनेसह पावसाची हजेरी
By नितीन काळेल | Published: May 16, 2024 04:04 PM2024-05-16T16:04:50+5:302024-05-16T16:05:11+5:30
साताऱ्यासह खटाव, कोरेगाव तालुक्यात पाऊस
सातारा : जिल्ह्यात वळवाचा पाऊस सुरूच असून गुरुवारी सातव्या दिवशीही मेघगर्जनेसह हजेरी लावली. सातारा शहर, कोरेगाव आणि खटाव तालुक्यात हा पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाडा कमी होण्यास मदत झाली आहे.
मे महिन्याची सुरुवात रखरखत्या उन्हाने झाली असलीतरी मागील आठ दिवसात वातावरणात खूप मोठा बदल झाला आहे. दुपारपर्यंत कडक ऊन असते. त्याचबरोबर तीव्र उकाडा जाणवतो. पण दुपारनंतर वळवाचा पाऊस होत आहे. सात दिवसापासून जिल्ह्यात दररोज कोठे ना कोठे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस पडत आहे. तसेच यावेळी जोरदार वारेही वाहत आहेत. आतापर्यंत पाटण तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. तसेच जावळी तालुक्यातही हजेरी लावली. मात्र या पावसामुळे नुकसानीचाही घटना घडत आहेत. विशेषता करून पाटण तालुक्यातच घरांचे नुकसान अधिक झाले आहे. गुरुवारीही सातारा शहराबरोबरच कोरेगाव आणि खटाव तालुक्यात वळवाचा पाऊस पडला.
सातारा शहरात दुपारी तीननंतर ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली. या पावसात जोर नव्हता. काही मिनिटेच पाऊस पडला. त्यानंतर रिमझिम सुरू झाली. सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते. तर शहराच्या पश्चिम भागातील परळी खोरे, पेट्री भागात अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडला. तर कोरेगाव आणि खटाव तालुक्यातही वळीव पावसाने हजेरी लावली. काही वेळच हा पाऊस झाला. तरीही वातावरण थंड होण्यास मदत झाली आहे.