कोयना, नवजाचा पाऊस २०० मिमीच्या उंबरठ्यावर; सातारा जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा पर्जन्यमान अधिक
By नितीन काळेल | Updated: June 12, 2024 18:54 IST2024-06-12T18:52:22+5:302024-06-12T18:54:38+5:30
महाबळेश्वरला २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद

कोयना, नवजाचा पाऊस २०० मिमीच्या उंबरठ्यावर; सातारा जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा पर्जन्यमान अधिक
सातारा : जिल्ह्यात दमदार पाऊस होत असून महाबळेश्वरला बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक ७५ मिलीमीटरची नोंद झाली. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे १७१ तर नवजाला २०२ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस अधिक पडला आहे.
सातारा जिल्ह्यात यावर्षी वळीव तसेच मान्सून पूर्व पाऊस कमी झाला. पण, मान्सूनचा पाऊस वेळेवर दाखल झाला आहे. ६ जूनपासूनच जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. सुरुवातीला पश्चिम भागातील घाट परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. महाबळेश्वर, कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळा, कांदाटी खोऱ्यात धुवाॅंधार पाऊस पडला. त्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र पाऊस होण्यास सुरूवात झाली. मागील आठ दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पावसाला लवकर सुरूवात झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे पडलेला आहे. तसेच पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी भागातही दमदार हजेरी लागली आहे. त्यामुळे ओढ्यांना पाणी वाहिले. तसेच बंधाऱ्यातही पाणीसाठा झाला आहे. त्यातच शेत जमिनीत पाणी साठल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग येणार आहे. त्याचबरोबर जावळी, पाटण, कऱ्हाड, वाई या तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे.
कोयना धरणात १४ टक्के साठा..
सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना आणि नवजालाही अवघ्या पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर मागील ११ दिवसांत कोयनेला १७१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. धरणात १५.२३ टीएमसी पाणीसाठा आहे. टक्केवारीत हे प्रमाण १४.४७ आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर येथे ७५ मिलीमीटर पडला आहे. एक जूनपासून महाबळेश्वरला १७१ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
मागीलवर्षी कोयनेला १२ मिलीमीटर पाऊस..
गेल्यावर्षी जिल्ह्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाला हाेता. तरीही २१ जूननंतरच मोठ्या प्रमाणात पावसाला सुरूवात झाली होती. त्यामुळे मागीलवर्षी १२ जूनपर्यंत पाऊस कमी होता. त्यावेळी कोयनानगर येथे १२, नवजाला २१ तर महाबळेश्वर येथे सर्वाधिक ३६ मिलीमीटर पाऊस पडलेला होता.