सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस; कोयना, उरमोडी, वीर, कण्हेर धरणाचे दरवाजे उघडले
By दीपक शिंदे | Published: July 25, 2024 12:38 PM2024-07-25T12:38:44+5:302024-07-25T12:39:04+5:30
कोयना धरणातून एकूण ११ हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात येणार
सातारा : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असून या पावसामुळे धरणांतील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सततच्या पावसामुळे ओढ्यांसह नद्यांनाही पूर आला असून काही ठिकाणी रस्त्यावरच झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतूक खोळंबली आहे. कोयना, वीर, निरा, उरमोडी या धरणात पाणी येण्याचा ओघ अधिक असल्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे धरण क्षेत्रातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक आहे. जिल्ह्यातील कोयना धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी दुपारी ४ वाजता. धरणातून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. तर पायथा गृहामधून १०५० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे एकूण ११ हजार ५० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कण्हेर धरणातून ५ हजार क्युसेक पाणी वेण्णा नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे म्हसवे पूल - करंजेकडून म्हसवे जाणारा तसेच हमदाबाज पूल हमदाबाज कडून किडगावकडे जाणारा या रस्त्यावरुन प्रवास न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बोगदा ते परळी रस्त्यावर भोंदवडे गावाजवळ रस्त्यावरच मोठे झाड पडल्याने काहीकाळ वाहतूक खोळंबली होती. प्रशासनाने तातडीने दखल घेत झाड बाजूला केल्यानंतर सुमारे एक तासाने वाहतूक सुरळीत झाली.