साताऱ्यात सलग पाचव्या दिवशीही वळीव पाऊस, माण तालुक्यात पाणी-पाणी
By नितीन काळेल | Published: May 14, 2024 05:29 PM2024-05-14T17:29:02+5:302024-05-14T17:29:38+5:30
सातारा : जिल्ह्यात वळवाचा पाऊस पडत असून सलग पाचव्या दिवशीही अनेक ठिकाणी हजेरी लावली. सातारा शहरात तर दुपारच्या सुमारास ...
सातारा : जिल्ह्यात वळवाचा पाऊस पडत असून सलग पाचव्या दिवशीही अनेक ठिकाणी हजेरी लावली. सातारा शहरात तर दुपारच्या सुमारास ढगाळ वातावरणामुळे अंधारून आले होते. त्यानंतर मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. माण तालुक्यातही मंगळवारी दुपारीनंतर चांगला पाऊस पडला. त्यामुळे पाणी-पाणी झाले.
जिल्ह्यात आत्तापर्यंत उन्हाळा तापदायक ठरला. संपूर्ण एप्रिल महिना रखरखीत उन्हाचा होता. तर मे महिना आणखी कडक ठरला. यामुळे लोक हैराण झाले होते. पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव आणि फलटण तालुक्यात जीवाची काहीली होत होती. सातारा शहराचे तापमान ४० अंशावर पोहोचलेले. त्यामुळे उन्हाळी पाऊस कधी सुरू होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच मागील आठवड्यापासून वातावरणात बदल झाला आणि वाळवाचा पाऊस पडू लागला. त्यामुळे पाराही खालावला आहे.
शहरात आज, मंगळवारी सलग पाचव्या दिवशी पाऊस पडला. अधिक करून दुपारनंतरच हा पाऊस होत आहे. दुपारी तीन वाजल्यापासून ढग जमण्यास सुरूवात झाली होती. चारच्या सुमारास अंधारून आले. त्यानंतर पावसाचे थेंब पडू लागले. मात्र, पावणे पाचच्या सुमारास पावसाला जोरदार सुरुवात झाली. तसेच यावेळी वारेही सुटले. मेघगर्जनेसह पाऊस पडू लागला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडला. यामुळे वातावरणातील उकाडा आणखी कमी होण्यास मदत झाली.
सातारा अन् वीजपुरवठा खंडित समीकरण..
सातारा शहरात मागील काही दिवसापासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. वारंवार वीज जात आहे. त्यामुळे महावितरणबद्दल सातारकरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर मंगळवारीही दुपारपासून अनेक भागातील वीज गेली होती. पाऊस उघडल्यानंतरही वीज आली नव्हती. त्यामुळे महावितरणबद्दल नागरिकांचा रोष आणखीन वाढला.