सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर, नवजाचा पाऊस ११०० मिलीमीटरजवळ

By नितीन काळेल | Published: July 1, 2024 07:12 PM2024-07-01T19:12:41+5:302024-07-01T19:13:21+5:30

महाबळेश्वरला सर्वाधिक पावसाची नोंद

Heavy rain in western part of Satara district, Navja rainfall near 1100 mm | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर, नवजाचा पाऊस ११०० मिलीमीटरजवळ

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर, नवजाचा पाऊस ११०० मिलीमीटरजवळ

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस वाढत असून २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक १५५ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयनेला ७२ आणि नवजा येथे ९७ मिलीमीटर पर्जन्यमान झाले. त्याचबरोबर एक जूनपासून आतापर्यंत नवजा येथे १,०७२ मिलीमीटर पाऊस पडला आहे. कोयना परिसरातही सतत पाऊस असल्याने धरणातील पाणीसाठा २० टीएमसीवर पोहोचला आहे.

जिल्ह्यात मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा मान्सूनचे आगमन वेळेत झाले. त्यामुळे ६ जूनपासूनच जिल्ह्यात पाऊस पडत आहे. सुरुवातीला पश्चिम भागाता पाऊस झाला. तसेच पूर्व दुष्काळी भागातही दमदार हजेरी लावली. पूर्वेकडे सतत आठ दिवस पाऊस पडत होता. यामुळे माण, खटाव, फलटण या तालुक्यातील दुष्काळी स्थिती कमी झाली. तसेच खरीप हंगामातील पेरणीलाही हा पाऊस उपयुक्त ठरला. त्यामुळे पूर्व भागासाठी पाऊस वरदान ठरला आहे. तर पश्चिम भागात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यातच काही दिवस पावसाची दडी होती. मात्र, मागील आठ दिवसांपासून पाऊस सुरू झाला. सध्या पावसाचे प्रमाण वाढले आहे.

पश्चिमेकडील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर वाढू लागला आहे. त्यामुळे सहा प्रमुख धरणांतही पाण्याची आवक वाढू लागली आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ७२ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर यावर्षी आतापर्यंत ८४३ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. नवजाला २४ तासांत ९७ तर महाबळेश्वरला १५५ मिलीमीटर पाऊस झाला. एक जूनपासून महाबळेश्वरला ८६३ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. या पावसामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात ११ हजार ९४३ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा २०.०४ टीएमसी झाला होता. १९.०४ पाणीसाठ्याची टक्केवारी आहे.

सातारा शहरात मागील पाच दिवसांपासून रिमझिम स्वरुपात पाऊस होत आहे. त्यातच उघडीप राहते. यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तर पूर्व भागात पावसाची उघडीप आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग आलेला आहे.

गतवर्षी कोयनेत १३ टीएमसी साठा..

जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण चांगले आहे. २०२३ मध्ये जूनअखेर कोयनानगरला एकूण ४६३ मिलीमीटर पाऊस झाला होता. तर नवजा येथे ६३१ आणि महाबळेश्वरला सर्वाधिक ८०८ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली होती. कोयना धरणात फक्त १२.७६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कोयनेत ७ टीएमसीहून अधिक पाणीसाठा आहे.

Web Title: Heavy rain in western part of Satara district, Navja rainfall near 1100 mm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.