सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोर‘धार’; महाबळेश्वर तालुक्यात वृध्द गेला वाहून 

By नितीन काळेल | Published: July 2, 2024 07:09 PM2024-07-02T19:09:18+5:302024-07-02T19:10:47+5:30

कोयना साठ्यात एक टीएमसीने वाढ : महाबळेश्वरला ११४ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद

Heavy rain in western part of Satara district; the old man was carried away In Mahabaleshwar taluka | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोर‘धार’; महाबळेश्वर तालुक्यात वृध्द गेला वाहून 

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोर‘धार’; महाबळेश्वर तालुक्यात वृध्द गेला वाहून 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्याने घाटरस्त्यात दरड कोसळणे, झाडे पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्यातही धुवाॅंधार पाऊस पडत असल्याने घावरी येथील वृध्द ओढ्याच्या पाण्यात वाहून गेला. संबंधिताचा शोध घेण्यात येत आहे. तर मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १०२ आणि महाबळेश्वरला ११४ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. कोयना धरण पाणीसाठ्यातही एक टीएमसीने वाढ झाली आहे. २१.१८ टीएमसी साठा झाला होता.

जून महिन्याच्या उत्तरार्धापासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस वाढू लागला. कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात पाऊस होत आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर येथे ११४ मिलीमीटर झाला आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत महाबळेश्वर येथे ९७७ मिलीमीटरची नोंद झाली आहे. त्यामुळे महाबळेश्वरचा पाऊसही एक हजार मिलीमीटरचा टप्पा पार करणार आहे. त्याचबरोबर कोयनानगर येथे आतापर्यंत ९४५ मिलीमीटर पाऊस झाला.

नवजा परिसरातही दमदार पाऊस होत आहे. नवजाला २४ तासांत ६२ मिलीमीटर पाऊस पडला. तर एक जूनपासून १ हजार १३४ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणक्षेत्रात ही पावसाचा जोर आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणात सुमारे १३ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ झाली. सकाळच्या सुमारास धरण पाणीसाठा २१.१८ टीएमसी झाला होता. तर २०.१२ टक्केवारी होती.  
         
पश्चिम भागात मागील आठ दिवसांपासून पाऊस जोर धरु लागल्याने ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत. तसेच अनेक भागात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ लागला आहे. कांदाटी खोऱ्यात तर पावसाची संततधार असल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. सातारा शहरातही पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी सकाळपासून जोरदार सरी कोसळत होत्या. यामुळे सखल भागात पाणी साचून राहिले. त्याचबरोबर वाई, जावळी, कऱ्हाड, पाटण या तालुक्यांतही पावसाचे प्रमाण वाढले आहे.

पोलिस, ट्रेकर्सच्या सहाय्याने शोधकार्य; पावसामुळे अडचण..

महाबळेश्वर तालुक्यात मंगळवारी सकाळपासूनही जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे ओढे ओसंडून वाहत आहेत. यामुळे नागरिकांसह जनावरांनाही धोका निर्माण झाला आहे. असे असतानाच मंगळवारी सकाळच्या सुमारास तालुक्यातील घावरी येथील बबन पांडुरंग कदम (वय ६२) हे वृध्द जनावरांना घेऊन गेले होते. त्यावेळी पावसामुळे ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. या पाण्यात कदम वाहून गेल्याची प्राथिमक माहिती देण्यात आली आहे. संबंधिताचा पोलिस तसेच ट्रेकर्स शोध घेत आहेत. पण, पावसामुळे अडथळे येत आहेत. त्यामुळे सायंकाळपर्यंततरी कदम यांचा शोध लागला नव्हता.

Web Title: Heavy rain in western part of Satara district; the old man was carried away In Mahabaleshwar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.