सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार; कोयना धरणातील पाणीसाठा ५० टीएमसीकडे..
By नितीन काळेल | Published: July 19, 2024 06:08 PM2024-07-19T18:08:09+5:302024-07-19T18:09:34+5:30
धरणात ३९ हजार क्यूसेकने आवक : नवजाला १६६, महाबळेश्वरला १३१ मिलीमीटरची नोंद
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात गुरूवारपासून संततधार असून २४ तासांत नवजाला सर्वाधिक १६६ तर महाबळेश्वरला १३१ मिलीमीटरची नोंद झाली. त्याचबरोबर धरणक्षेत्रातही पाऊस वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणात आवक वाढून सुमारे ३९ हजार क्यूसेकवर पोहोचली. तर धरणातील पाणीसाठा ४७ टीएमसीवर गेला आहे.
पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजा, महाबळेश्वरसह कोयना परिसरात चार दिवस पावसाची उघडझाप सुरू होती. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचीही आवक कमी झालेली. मात्र, गुरूवारपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पश्चिमेकडेच सर्वत्रच एकसारखा पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे ओढे, नाले पुन्हा खळाळून वाहू लागले आहेत. त्याचबरोबर धोम, बलकवडी, तारळी, कण्हेर, उरमोडी धरणक्षेत्राही पाऊस वाढत आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. तर कोयना धरणक्षेत्रात पावसाचा जोर एकदम वाढला. सर्वत्रच पाऊस होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. परिणामी पाणीसाठा वाढत चालला आहे.
शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक १६६ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर यावर्षी आतापर्यंत २ हजार ६२० मिलीमीटर पाऊस पडला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस अधिक झाला आहे. तर कोयनेला २४ तासांत ११४ आणि आतापर्यंत २ हजार २०१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. महाबळेश्वरच्या पावसानेही दोन हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला. शुक्रवारी सकाळपर्यंत २ हजार ६ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली. तर कोयना धरणात ३८ हजार ७७६ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ४७.४१ टीएमसीवर पोहोचला होता. धरण भरण्यासाठी अजून सुमारे ५७ टीएमसी पाण्याची गरज आहे.
साताऱ्यात सकाळपासूनच रिमझिम..
सातारा शहरातही पाऊस वाढत चालला आहे. गुरूवारी रात्रीपासून रिमझिम पावसाला सुरूवात झाली. रात्रभरही पाऊस पडत होता. तसेच शुक्रवारी सकाळीही पाऊस सुरूच होता. यामुळे नागरिकांनाही रेनकोट घालून आणि छत्री घेतल्याशिवाय घराबाहेर पडता येत नव्हते. तर पूर्व भागात अनेक ठिकाणी पावसाच्या झडी येऊन जात आहेत.