रहिमतपूर परिसरात धुवाँधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:39 AM2021-05-10T04:39:40+5:302021-05-10T04:39:40+5:30
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात रविवारी विजांच्या कडकडाटासह धुवाँधार पाऊस कोसळला. सुमारे तासभर पडलेल्या वादळी वाऱ्याच्या जोरदार पावसाने ...
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात रविवारी विजांच्या कडकडाटासह धुवाँधार पाऊस कोसळला. सुमारे तासभर पडलेल्या वादळी वाऱ्याच्या जोरदार पावसाने नांगरट केलेल्या शेतातील ढेकळे फुटून पाण्याचे लोट वाहिले. पावसामुळे शेतकऱ्यांसह वाहनधारकांची पुरती दैना उडाली.
रहिमतपूर परिसरात रविवारी सकाळपासूनच कमालीचा उकाडा जाणवत होता. सायंकाळी पावणेचारच्या सुमारास आकाशात ढगांनी गर्दी केली आणि बघताबघता वादळी वाऱ्याबरोबरच विजांचा कडकडाट सुरू झाला. गारांच्या तडाख्यासह जोरदार पावसाने सुरुवात केली. रहिमतपूर परिसराला सलग दुसऱ्या दिवशी पावसाने तडाखा दिला. विजांचा कडकडाट धडकी भरवणारा होता. पावसापासून बचावासाठी आडोशाला उभे राहिलेले नागरिक विजांच्या कडकडाटाने घाबरून जात होते. रहिमतपूरसह साप, वेळू, बेलेवाडी, अपशिंगे, पिंपरी, अंभेरी, बोरीव, दुघी, रंगनाथ स्वामींची निगडी, शिरंबे, वाठार, किरोली आदी गावांना पावसाचा तडाखा बसला.
वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे दुचाकी चारचाकी वाहनचालकांनाही पुढे काहीच दिसत नसल्याने रस्त्याकडेलाच वाहने उभी करून पावसाचा जोर ओसरल्यानंतर पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे पावसाला सुरुवात होताच काही वेळातच रस्ते सुनसान झाले होते. उसाच्या सऱ्या काठोकाठ तुडुंब भरून वाहिल्या तर नांगरट केलेली शेतातील ढेकळे पूर्णपणे फुटून नांगरटीच्या शेतातूनही पाण्याचे लोट वाहिले.
फोटो : ०९रहिमतपूर
रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे रविवारी झालेल्या पावसाने नांगरट केलेल्या शेतातील ढेकळे फुटून पाण्याचे लोट वाहिले. (छाया : जयदीप जाधव)