साताऱ्यात मुसळधार पाऊस
By Admin | Published: October 3, 2015 11:05 PM2015-10-03T23:05:56+5:302015-10-03T23:08:28+5:30
खटाव, माण, कोरेगाव, कऱ्हाड, पाटण तालुक्यांतही पाऊस
सातारा : ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने शनिवारी सायंकाळी सातारा शहर व परिसराला झोडपून काढले. जिल्ह्यात खटाव, माण, कोरेगाव, कऱ्हाड, पाटण तालुक्यांतही पाऊस झाला.
शहरात दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत होता. दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते. सायंकाळी चारच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अर्धा तास झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. ओढे, नाले पाण्याने भरून वाहत होते. रस्त्यावरूनही पाणी वाहत होते. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेतील नागरिक व व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. काही किरकोळ विक्रेत्यांचे साहित्य भिजल्याने त्यांचे नुकसान झाले. सातारा तालुक्यातही अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. नागठाणे येथे ओढे, नाले भरून वाहत होते. सेवा रस्तेही पाण्यात बुडाले होते. शहराच्या पश्चिमेस डोंगरभागात दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
कास पुष्प पठारावर शनिवारी हजारो पर्यटकांनी भेट दिली. दुपारपर्यंत उन्हाच्या तडाख्याने पर्यटक हैराण झाले होते. मात्र, सायंकाळी झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. पाऊस पडल्यानंतर यवतेश्वर घाटात दाट धुके पसरले होते. त्यामुळे वनराई चांगलीच खुलली होती.
खटाव : खटाव तालुक्यात सायंकाळी पाच वाजता सुमारे दोन तास जोरदार पाऊस झाला. रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्यामुळे दुष्काळी भागासाठी हा पाऊस फायद्याचा ठरणार आहे, असे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.
पाटण : मल्हारपेठ (ता. पाटण) येथे दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. मोठ्या पावसामुळे ओढे, नाले पाण्याने भरून वाहिले. निसरे येथे रस्त्याकडेला नाल्यात तसेच शेतात पाणी साचले होते.
रस्त्यावरूनही पाणी वाहत असल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना तारेचरची कसरत करावी लागली. परतीच्या पावसामुळे तूर, भात, ऊस यांसह अन्य काही पिकांना जीवदान मिळाले आहे. (प्रतिनिधी)