मायणी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:38 AM2021-05-24T04:38:36+5:302021-05-24T04:38:36+5:30
मायणी : मायणी व मायणी परिसरामध्ये रविवार सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाट जोरदार पाऊस झाला. पाऊस व वारा सुरू ...
मायणी : मायणी व मायणी परिसरामध्ये रविवार सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाट जोरदार पाऊस झाला. पाऊस व वारा सुरू झाल्याने वीजपुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. या उन्हाळी पावसामुळे खरीप हंगामात फायदा होणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात उकाडा वाढला होता. अधूनमधून ढग येत होते मात्र पाऊस हुलकावणी देत होता. त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले होते. सर्वसामान्य ग्रामस्थही पावसाच्या प्रतीक्षेत होते. रविवारी सकाळपासूनच वातावरणात प्रचंड गर्मी होती. उकाड्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले होते दुपारपासून काळेकुट्ट ढग जमा होऊ लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य ग्रामस्थांचे डोळे आकाशाकडे लागले होते.
सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मायणी व परिसरातील बहुतांशी गावांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाट त्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा ते पाऊण तास सर्वत्र पाऊस झाला. सोसाट्याचा वारा असूनही कोठे नुकसान झाल्याचे वृत्त रात्री उशिरापर्यंत नव्हते. वारा असल्याने अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
रविवारी सायंकाळी झालेल्या पावसाने परिसरामध्ये पाणीसाठा निर्माण झाला होता. शिवाय रब्बी हंगामात शेतीची मशागतीची कामे पूर्ण झाली असून हा उन्हाळी पाऊस शेतकरी वर्गासाठी समाधानकारक आहे शिवाय हवेत गारवा निर्माण झाल्याने सर्वसामान्य ग्रामस्थांनाही उकाड्यापासून थोडाफार दिलासा मिळाला आहे.
मायणी परिसरात रविवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे शेतजमिनीमध्ये असा पाणीसाठा निर्माण झाला होता. (छाया : संदीप कुंभार)