पुसेगावला विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:42 AM2021-05-07T04:42:08+5:302021-05-07T04:42:08+5:30
पुसेगाव : पुसेगाव व परिसरातील विविध गावात गुरुवारी भरदुपारी ४ वाजल्यापासून उन्हाळी मान्सून पूर्व पावसाने ...
पुसेगाव : पुसेगाव व परिसरातील विविध गावात गुरुवारी भरदुपारी ४ वाजल्यापासून उन्हाळी मान्सून पूर्व पावसाने विजेच्या कडकडाटासह व सोसाट्याच्या वाऱ्यासह हजेरी लावली. शेतातील लहान-मोठ्या ओढ्याला पूर आला तर जागोजागी झाडे पडून नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळपासूनच हवेत प्रचंड उष्णता जाणवत होती. उखड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळाला असला तरी शेतकरी व वीटभट्टी मालकांना मात्र या पावसाचा मोठा झटका बसला आहे.
दुपारी चारच्या सुमारास पुसेगाव व परिसरातील कटगुण, उंबरमळे, निढळ, बुध, राजापूर, वेटणे, रणसिंगवाडी, खातगुण, विसापूर, वर्धनगड, पवारवाडी, नेर या भागात वादळी वारा व मेघगर्जनेसह या पावसाने सुरुवात झाली. सध्या शेतात नांगरटीची व मशागत पूर्व कामे सुरू आहेत. या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. या अवकाळी पावसाने भरात आलेल्या आंबा पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वीट उत्पादकांना या पावसाने मोठा फटका बसला आहे. जोरदार पावसाने जागोजागी लहान झाडे उन्मळून पडून, विजेच्या तारांचे नुकसान झाले आहे. पुसेगाव बुध रस्त्यावर पुलाचे काम सुरू असल्याने अडवलेल्या ओढ्यामुळे आलेल्या पुराचे पाणी रस्त्यावरून गेल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या पुलाचे काम तातडीने पूर्ण करून अडवलेल्या ओढा तत्काळ मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
०६ पुसेगाव पाऊस
फोटो
: पुसेगाव-बुध रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असल्याने अडवलेल्या ओढ्याचे पुराचे पाणी रस्त्यावरून गेल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.