उंब्रज येथील 56 पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 03:17 PM2019-08-06T15:17:51+5:302019-08-06T15:22:15+5:30
कराड तालुक्यातील उंब्रज येथील 56 पुरग्रस्तांना सुरक्षेतेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासाने जिल्हा परिषदेत तात्पुरती निवाऱ्यांची सोय केली आहे.
सातारा - कराड तालुक्यातील उंब्रज येथील 56 पुरग्रस्तांना सुरक्षेतेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासाने जिल्हा परिषदेत तात्पुरती निवाऱ्यांची सोय केली आहे.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी मंगळवारी (6 ऑगस्ट) उंब्रज येथील 56 पुरग्रस्तांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी या पुरग्रस्तांना अन्न व पाण्याची सोय करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी कराडचे प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी नागठाणे जवळील उरमोडी नदीवरील पुलाची व उंब्रज येथील तारळी नदीवरील पुलांचीही पाहणी केली.
सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापनासाठी अहोरात्र मिशन मोडवर काम करीत आहे. उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा फटका हा जिल्ह्यातील 598 कुटुंबे तर 2 हजार 568 नागरिकांना बसला आहे. या नागरिकांची जिल्हा परिषद शाळा, नगर परिषद शाळा, अंगणवाड्या, समाजमंदिरामध्ये, मंदिरांमध्ये, तात्पुरते शेड उभे करुन त्यांची तात्पुत्या निवाऱ्याबरोबर त्यांच्या अन्न पाण्याचीही सोय जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
कराड शहराला पुराने वेढले; NDRF टीम दाखल
दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. कृष्णा, कोयना या नद्यांना पूर आल्याने कराड, पाटण परिसरात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून एनडीआरएफची टीम मागविण्यात आली आहे. पाटण व कराड तालुक्यातील पुरस्थितीत लोकांच्या सुरक्षेच्या कारणासाठी आज पुण्यावरुन एनडीआरएफची टीम जिल्ह्यात दाखल होणार आहे. या टीमला प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊन पुरग्रस्तांना मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली आहे.
एनडीआरएफ टीमकडे 2 बोटी व प्रशासनाकडे 2 बोटी असे एकूण 4 बोटी असून या बोटी कराड व पाटण तालुक्यातील लोकांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहेत. या एनडीआरएफच्या टीममध्ये 22 ते 24 जवान असणार असून या टीमला प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांनुसार ही टीम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी काम करणार आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आहे. कराडलाही तुफान पाऊस सुरू आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणने नवीन कृष्णा पुलावरील वाहतूक बंद करण्याच्या सुचना पत्राद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे कराड- विटा रोडवरील नवीन कृष्णा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन कराड तालुका प्रशासनाने केले आहे.