सातारा: कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणात 'इतका' पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 02:50 PM2022-08-08T14:50:39+5:302022-08-08T14:54:27+5:30
दडी मारलेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याने कोयना धरणात पाण्याची आवक वाढली
प्रमोद सुकरे
कराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्राात पावसाचा जोर वाढला आहे. आज, सोमवारी सकाळपासूनही मुसळधार पाऊस सुरुच आहे. आज, सकाळी मिळालेल्या माहितीनुसार गत चोवीस तासात धरणात सव्वा दोन टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणात 68.89 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
महाबळेश्वरमध्ये 130 मिलीमीटर पावसाची नोंद
कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर आहे. गेल्या चोवीस तासात महाबळेश्वर येथे सर्वाधिक 130 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजा येथे 115 मिलीमीटर आणि कोयनानगर येथे 92 मिलीमीटर पाऊस झाला आहे. दमदार पावसामुळे कोयना धरणात प्रतिसेकंद 17,052 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा 68.89 टीएमसी तर पाणीपातळी 2128 फूट झाली आहे.
दमदार पावसामुळे पाण्याची आवक वाढली
दडी मारलेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याने कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे. सध्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक प्रतिसेकंद 17 हजार क्युसेकवर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात धरणात तब्बल 2.21 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.