मुसळधार पावसाने ओढे-नाले भरून वाहिले!
By admin | Published: October 2, 2015 11:31 PM2015-10-02T23:31:23+5:302015-10-02T23:33:36+5:30
सोळशीत हंगामात पहिल्यांदाच धो-धो : महाबळेश्वरमध्ये पर्यटकांनी लूटला वर्षासहलीचा आनंद; सातारा, फलटणमध्येही हजेरी
सातारा : सातारा शहरासह कोरेगाव, महाबळेश्वर, फलटण, खटाव तालुक्यांत शुक्रवारी दुपारनंतर परतीच्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे ओढे, नाले भरून वाहत होते.
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील दुष्काळी पट्ट्यात शुक्रवारी जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सोळशीतील लहान-मोठे पाझर तलाव भरण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. तर काही भागांतील ऊस झोपला आहे.
गेली अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक गावांमध्ये ग्रामस्थांना पिण्यासाठी टँकर सुरू केले होते. या भागातील नांदवळ, नळहिरा, अरबवाडी, भांडले येथील तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे या भागांच्या आशा परतीच्या पावसावरच अवलंबून आहेत.
वाठार स्टेशन परिसरात गेल्या चार -पाच दिवसांपासून वातावरणात उष्मा वाढला होता. शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून या भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सोळशी, रणदुल्लाबाद, तडवळे (संमत) वाघोली, विखळे, वाठार स्टेशन या भागात पाऊस झाला. या पावसामुळे ज्वारीला फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये गेल्या दोन दिवस परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गुरुवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळदार पाऊस झाला. सुमारे तीन तास पाऊस झाला. यामुळे महाबळेश्वरमधील पर्यटकांनी शुक्रवारी दिवसभर वर्षासहलीचा आनंद घेतला.
शहरात शुक्रवारी सकाळपासूनच वातावरणात उष्मा जाणवत होता. मात्र दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. सलग सुट्यांमुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची वर्दळ वाढली होती. त्यातच दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे महाबळेश्वरच्या बाजारपेठेत काहीकाळ अघोषित संचारबंदी निर्माण झाल्याचीच परिस्थिती दिसून येत होती.
अचानक झालेल्या पावसामुळे वातावरण बदलले अन् गारवा निर्माण झाला. पाऊस कमी झाल्याने सर्वत्र धुकेच धुके पसरले होते. या थंड वातावरणात पर्यटक मक्याची गरमागरम कणीस, चहा, गरमागरम भज्जी व चणे यांचा आस्वाद घेताना दिसत होते. बदललेल्या वातावरणाचा आनंद घेत होते, पावसामुळे स्थानिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण पन्नास टक्क्यांहून कमी आहे. १ जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंत १५१ इंच पाऊस झाला असल्याची नोंद झाली आहे.
परतीच्या पावसाने महाबळेश्वर व परिसराला चांगलेच धुऊन काढले. त्यामुळे लहान-मोठ्या विक्रेत्यांचा फायदा झाला. सायंकाळनंतर बाजारपेठेत गर्दी झाली
होती. (प्रतिनिधी)