चाफळ विभागाला जोरदार पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:38 AM2021-07-31T04:38:33+5:302021-07-31T04:38:33+5:30
चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागाला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आहे. अनेक गावांना जोडणारे रस्ते, फरशी पूल पाण्याखाली गेल्याने ...
चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागाला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आहे. अनेक गावांना जोडणारे रस्ते, फरशी पूल पाण्याखाली गेल्याने तर काही ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. डोंगर उतारावरील केळोली, पाडळोशी, धायटी आदी गावांत पावसाचे पाणी शेतात घुसल्याने भातशेती वाहून गेली आहे. नाणेगाव खुर्द गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर गाळाने भरून पाइपलाइन वाहून गेल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. विरेवाडीमार्गे पाटणला जोडणारा घाट रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. एकूणच चाफळ विभागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. या नुकसानग्रस्तांना शासनाने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
चाफळ विभागात सध्या जोरदार अतिवृष्टी सुरू आहे. या अतिवृष्टीचा फटका शेतकरीवर्गाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. उभी भातशेती वाहून गेल्याने बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. नाणेगावमध्ये शेतीचे खूप नुकसान झाले आहे. नदी आणि ओढ्याशेजारील शेतात पावसाचे पाणी गेल्यामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामपंचायत पाणीपुरवठ्याची विहीर पूर्ण गाळाने भरली आहे. पाइपलाइन वाहून गेल्याने गावचा पाणीपुरवठा बंद पडला आहे. शिंगणवाडी येथे रस्त्यावर झाड पडून वाहतूक काही काळ बंद पडली होती. काही युवकांनी प्रसंगावधान राखत झाड हटविल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली, तर ओढ्याचे पाणी रस्त्यावर येऊन रस्त्याची व फरशी पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे.
केळोली येथे गणपत किसन मोरे, बाजीराव किसन मोरे, आनंदा विठ्ठल साळुंखे, विजय रामचंद्र लोखंडे आदींसह अन्य शेतकऱ्यांची भातशेती वाहून गेली. डेरवण गावाला जोडणारा चिकूल ओढ्यावरील फरशी पूल पाण्याखाली गेल्याने डेरवण, भैरेवाडी गावांचा संपर्क तुटला आहे. चाफळवरून केळोलीमार्गे पाटणला जोडणारा रस्ता विरेवाडी घाटात खचल्याने वाहतूक बंद झाली आहे. चाफळ पाडळोशी रस्त्यावरील धायटी गावानजीक ओढ्याचे पाणी फरशी पुलावरून थेट रस्त्यावर आल्याने या ठिकाणचीही वाहतूक ठप्प होऊन शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
एकंदरीतच विभागात पडत असलेल्या जोरदार पावसाने मोठे नुकसान केले असून शासनाने नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
चौकट :
चाफळ केळोलीमार्गे पाटणला जोडणारा घाट रस्ता जागोजागी खचू लागला आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. ग्रामस्थांनी या रस्त्यावरून वाहतूक करू नये, असे आवाहन शिवदैवत बँकेचे संचालक चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
२३ ढेबेवाडी
ढेबेवाडी परिसरात पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे पूल, ओढे वाहून गेले. (छाया : रवींद्र माने)