Satara: कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर; पाणीसाठ्यात झाली वाढ
By नितीन काळेल | Published: June 22, 2024 07:32 PM2024-06-22T19:32:31+5:302024-06-22T19:33:00+5:30
नवजाला ७४ मिलिमीटर नोंद : पूर्व भागात उघडीप साताऱ्यात ढगाळ वातावरण
सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप असली तरी पश्चिमेकडे जोर कायम आहे. यामुळे कोयना धरण पाणीसाठ्यात दोन दिवसांत एक टीएमसीने वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा १६ टीएमसीजवळ पोहोचला. तर शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात नवजाला सर्वाधिक ७४ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल झाला. ६ जूनपासून सर्वत्र पावसाला सुरुवात झाली. पूर्व भागात यंदा धो-धो पाऊस बरसला. त्यामुळे ओढ्यांना पाणी वाहिले. बंधारे भरले आहेत. तसेच विहिरींची पाणीपातळीही वाढली आहे .सध्या जमिनीला वापसा नसल्याने खरीप हंगामातील पेरणी खोळंबलीय. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना पाणी कमी पडणार नाही. परिणामी खरीपातील पेरणी यंदा १०० टकके होण्याचा अंदाज आहे. तर पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
मागील तीन दिवसापासून पूर्व भागात पाऊस कमी झाला असलातरी पेरणीसाठी अडचणी येणार नाही. तर पश्चिमेकडे पावसाचा जोर आहे. कास, बामनोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वर यासह कांदाटी खोऱ्यात पाऊस पडत आहे. तसेच पश्चिमेकडील धरण क्षेत्रातील पाऊस सुरू आहे .यामुळे धरण पाणीसाठा हळूहळू वाढू लागलाय.
शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात कोयनानगर येथे ६८ तर नवजाला ७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरलाही ६० मिलिमीटर पाऊस पडला. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयना येथे ५०७, नवजा ६२६ आणि महाबळेश्वरला ४२१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. दोन दिवसात कोयना धरणात एक टीएमसीने वाढ झाली आहे. शनिवारी सकाळी धरणात १५.९१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणातील विसर्ग मागील काही दिवसापासून बंद आहे.
कोयना धरणात मागीलवर्षी ११ टीएमसी साठा; पाऊसही कमी..
जिल्ह्यात गेल्यावर्षी मान्सूनचे आगमन उशिरा झाले. तसेच पावसालाही उशिरा सुरुवात झाली. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला नव्हता. मागीलवर्षी २२ जूनपर्यंत कोयनानगर येथे ७७, नवजा ८४ आणि महाबळेश्वर येथे १०२ मिलिमीटर पाऊस झाला होता. तर कोयना धरणात १०.८२ टीएमसी एवढा साठा शिल्लक होता.