सातारा: रहिमतपुरात पावसाचे तांडव, कमंडलू नदीवरील पुलाचा भराव ढासळला; वाहतूक ठप्प, पिके गेली वाहून
By प्रशांत कोळी | Published: October 14, 2022 06:59 PM2022-10-14T18:59:38+5:302022-10-14T19:00:05+5:30
पुलाचे लोखंडी दरवाजे न उघडण्याचा जोरदार फटका पुलाला व शेजारील डांबरी रस्त्याला बसला
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात पावसाने अक्षरशः तांडव केले. धुवाधार पावसाने कमंडलू नदीवरील पुलाचा भराव ढासळला असून पुलाचे लोखंडी अँगल वाहून गेले आहेत. तर ओढ्याला आलेल्या मोठ्या पुरामुळे अनेक गावातील लहान पूल सिमेंटच्या पाईपसह वाहून गेले. ओढ्याच्या बाजूच्या शेतातील पिकेही वाहून गेल्याने लाखोंचे नुकसान झाले. अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली.
रहिमतपूर परिसरात सायंकाळी पाच वाजल्यापासून विजेच्या कडकडाटासह धुवाधार पावसाला सुरुवात झाली. कमंडलू नदीवरील पुलावरून पाणी वाहिले. या पुलाचे लोखंडी दरवाजे न उघडण्याचा जोरदार फटका पुलाला व शेजारील डांबरी रस्त्याला बसला आहे. सुमारे एक टन वजनाचा एक दरवाजा याप्रमाणे दहा दरवाजे या पुलाला बसविण्यात आले आहेत. मात्र पावसाचे तांडव सुरू असतानाही दरवाजे न उचलल्यामुळे पुराच्या पाण्याचा फटका पुलावरील लोखंडी पाईपला बसून लोखंडी पाइप तुटून वाहून गेल्या. तसेच पाण्याच्या दाबामुळे पुलाचा भराव ढासळला असून, पुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, काही लोखंडी पाइप मोडलेल्या स्थितीत पुलावरच आडव्या अस्ताव्यस्त पडल्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक बंद झाली होती. नदीच्या काठाला कडब्याच्या लावलेल्या अनेक गंजी व शेणखताचे उकिरडे वाहून गेले आहेत. जोरदार पावसामुळे क्रीडा संकुलाच्या ओढ्याकडील अनेक व्यापारी गाळ्यांमध्ये पाणी शिरले.
साप येथील गावडे मळा येथे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्याला मोठा पूर आल्यामुळे ओढ्यावरील सिमेंट पाईप टाकलेला रस्ता सिमेंट पाइपसह वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांसह शेतकऱ्यांशी गैरसोय झाली आहे. सुर्ली येथील करंजाली ओढ्याला आलेल्या मोठ्या पुरामुळे पूल आणि रस्त्यांमधील भराव वाहून गेला आहे. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
जयपुरातील दोन एकरातील पीक गेले वाहून...
अतिवृष्टीमुळे ओढ्याला आलेल्या महापुरामुळे ओढ्याकडेच्या शेतातील प्रकाश निकम यांचे वीस गुंठे शेतातील आले पीक, विठ्ठल निकम यांचे दहा गुंठे शेतातील सोयाबीन, बबन पवार यांचे दहा गुंठे शेतातील ऊस व प्रल्हाद निकम यांच्या चाळीस गुंठे शेतातील टोमॅटो पीक असे एकूण दोन एकरातील शेतीपिके वाहून गेली आहेत. यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. सरपंच, उपसरपंच, कृषी सहायक, मंडलाधिकारी विनोद सावंत व तलाठी अनिल दिंडे यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पंचनामा केला आहे. हातातोंडाला आलेली पिके पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.