सातारा शहरात जोरदार पाऊस, नागरिकांची उडाली चांगलीच धांदल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 03:21 PM2023-09-26T15:21:06+5:302023-09-26T15:21:48+5:30
सातारा शहरात मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.
सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या वरूनराजाने मंगळवारी दुपारी सातारा शहर व परिसराला झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे शहरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले तर विक्रेते व खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.
सातारा शहरात मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी बारानंतर पावसाचा एक- दोन सरी बरसल्या. यानंतर पावसाने उघडीत दिली. मात्र, दोन वाजण्याच्या सुमारास पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावली.
विजेचा कडकडाट व वेगवान वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले. गणेश मंडळाकडून उभारण्यात आलेले भव्य-दिव्य देखावे देखील या पावसात भिजल्याने नुकसान झाले आहे.