Satara: कोयना धरणात तब्बल सहा टीएमसी पाण्याची आवक, पाणीसाठ्यात दीड टीएमसीने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 01:46 PM2024-07-01T13:46:17+5:302024-07-01T13:46:37+5:30
नीलेश साळुंखे कोयनानगर : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जून महिन्यात काही दिवस दमदार हजेरीवगळता पावसाची रिमझिम सुरू असल्याने धरणामध्ये ...
नीलेश साळुंखे
कोयनानगर : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जून महिन्यात काही दिवस दमदार हजेरीवगळता पावसाची रिमझिम सुरू असल्याने धरणामध्ये सहा टीएमसी पाण्याची आवक झाली आहे तर धरणाच्या पाणीसाठ्यात सुमारे दीड टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात सध्या १९.०१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
कृष्णा पाणी वाटप लवादानुसार नवीन तांत्रिक वर्ष १ जूनपासून सुरू झाले आहे. त्यास एक महिना पूर्ण होत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. विजेचा लखलखाट, कधी ढगांच्या गडगडाटासह अचानक धो-धो पाऊस पडला तर अचानक स्वच्छ प्रकाशासह रखरखत ऊन पडत होते. या ऊन व पावसाचा खेळात महिना संपला. या पावसाने कोयना नदी तुडुंब भरून वाहू लागली की पूर्वेकडे पायथा वीजगृहातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग ८ जूनला बंद करण्यात आला, तो आजवर कायम आहे.
मात्र, जून महिन्यात कोयना भागात पावसाच्या हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरीने बळिराजा सुखावला आहे. भात नाचणीचे तरवे हिरवेगार तजेलदार आहे. काही ठिकाणी लावणीस सुरूवात झाली आहे. एकंदरीत पावसाने शेतीच्या कामांना गती आहे. यापुढे जुलै महिन्यात धरण भरण्यासाठी व भात लावणीसाठी मुसळधार पावसाची गरज आहे.
कोयना धरणात ३० जूनला सकाळी आठ वाजता १९.०१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. जून महिन्यात ५.६५ टीएमसी पाण्याची आवक झाली असून यामधील पश्चिमेला वीजनिर्मितीसाठी ३.४४ टीएमसी पाण्याचा वापर करत १५० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. पूर्वेला सिंचनासाठी पायथा वीजगृहातीतून १.०३ टीएमसीचा वापर करत ३ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. बाष्पीभवन व गळतीसह ४.७२ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यातही सुमारे दीड टीएमसीने वाढ झाली आहे.
पाणलोट रविवारी सायंकाळीपर्यंत झालेला एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये
- कोयना : ८०१
- नवजा १०२३
- महाबळेश्वर ८००
- वळवण ११०८
पाथरपुंज येथे पुन्हा धो-धो
सातारा, सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरील सह्याद्री पर्वतरांगांतील पाटण तालुक्यातील पाथरपुंज याठिकाणी ११७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बहुधा जिल्हातील सर्वाधिक आहे. २०१९ मध्ये पाथरपुंज याठिकाणी दहा हजार मिलिमीटर पाऊस झाल्याची नाेंद होती. देशात सर्वाधिक पाऊस पडत असलेल्या चेरापुंजीला पाथरपुंजने मागे टाकले होते.
मागील ३ वर्षांतील जून महिन्यातील धरणाचा पाणीसाठा
वर्ष - पाणीसाठा - महिन्यात वाढ
- २०२१ : ४२.४२ टीएमसी - १३.१५ टीएमसी वाढ
- २०२२ : २१.१८ टीएमसी - ७.६३ टीएमसी वाढ
- २०२३ : १२.२१ टीएमसी - ५.४३ टीएमसी घट
- २०२४ १९.०१ टीएमसी - १.४३ टीएमसीने वाढ