सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर, कोयना धरणातून ११ हजार ६४६ क्यूसेकने विसर्ग सुरू
By नितीन काळेल | Published: September 27, 2024 07:27 PM2024-09-27T19:27:23+5:302024-09-27T19:27:50+5:30
महाबळेश्वरला ११४ मिलिमीटरची नोंद
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असून २४ तासांत महाबळेश्वरला ११४ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात आवक वाढल्याने मध्यरात्रीच्या सुमारासच दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळच्या सुमारास कोयना धरण दुसऱ्यांदा पूर्ण भरले. धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून परतीचा पाऊस जोर धरु लागला आहे. माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यात दमदार हजेरी लावली आहे. यामुळे ओढे भरुन वाहत आहेत. तलवांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढू लागला आहे. तरीही या पावसाचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसू लागलाय. काढणीच्या वेळीच पाऊस होत असल्याने नुकसान पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. त्याचबरोबर पश्चिम भागातही पाऊस वाढला आहे. तर पश्चिमेकडेच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी हे मोठे पाणी प्रकल्प आहेत. या सहा प्रकल्पात एकूण १४८ टीएमसीवर पाणीसाठा होतो. हे सर्व धरणे भरली आहेत. यामुळे पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग सुरू करण्यात येत आहे.
शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ६५ तर नवजाला ८० आणि महाबळेश्वरमध्ये ११४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तसेच धरण क्षेत्रातही पाऊस होत आहे. यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास कोयनेत २३ हजार ७८७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर सकाळी धरणात १०५.२५ टीएमसी साठा झाल्याने १०० टक्के भरलेले आहे.
त्यातच गुरूवारी सायंकाळनंतर कोयनेत पाण्याची आवक वाढली होती. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास कोयनेचे सहा दरवाजे एक फुटाने उचलून विसर्ग सुरू करण्यात आला. सकाळच्या सुमारास धरणातून पायथा वीजगृह २ हजार १०० आणि दरवाजातून ९ हजार ५४६ असा एेकूण ११ हजार ६४६ क्यूसेक विसर्ग सुरू होता.