शिरवळसह परिसराला पावसाने जोरदार झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:40 AM2021-04-27T04:40:50+5:302021-04-27T04:40:50+5:30
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ व परिसराला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सोमवारी (दि. २६) चारच्या दरम्यान ढगाळ वातावरण ...
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ व परिसराला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सोमवारी (दि. २६) चारच्या दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. या पावसामुळे महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. दरम्यान, मुसळधार पावसामुळे रस्त्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागला आहे.
शेतामध्ये कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांबरोबर नागरिकांचीही अचानकपणे आलेल्या मुसळधार पावसाने भंबेरी उडाली आहे.
त्याचप्रमाणे उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेपासून दिलासा मिळत नागरिकांसह लहानग्यांना पावसामध्ये भिजण्याचा मोह आवरता आला नाही. साधारणपणे दीड तास पावसाने विजेच्या कडकडाटासह शिरवळमध्ये जोरदार बँटिंग केली.
शिरवळसह पळशी, धनगरवाडी, शिदेंवाडी या ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे.
याआधीच विविध कारणांमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये मुसळधार पावसामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतामध्ये पाणी साचत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, सातारा जिल्हाबंदीचा आदेश असल्याने सारोळा पुलावर बंदोबस्तकरिता असलेल्या पोलीस कर्मचारी व
अधिकाऱ्यांना पावसामुळे मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला.
२६शिरवळ
शिरवळ येथे मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने आशियाई महामार्गावरील वाहतूकही मंदावली होती.(छाया : मुराद पटेल)