हेळगाव पशुवैद्यकीय केंद्राला डॉक्टर मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:36 AM2021-04-12T04:36:39+5:302021-04-12T04:36:39+5:30
मसूर : हेळगाव (ता. कऱ्हाड) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला कोणी वाली आहे की नाही, अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
मसूर : हेळगाव (ता. कऱ्हाड) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला कोणी वाली आहे की नाही, अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हेळगावअंतर्गत परिसरातील १२ गावांचा समावेश असलेले पशुवैद्यकीय केंद्र कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने ओस पडलेले असते. या पशुवैद्यकीय केंद्राची गत दहा ते बारा वर्षांपासून हीच असून, यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा सवाल या १२ गावांतील शेतकरी वर्गाने केला.
येथील पशुवैद्यकीय केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर मिळावेत यासाठी या विभागातील सर्व ग्रामपंचायती, ग्रामस्थांनी संबंधित खात्याकडे वारंवार लेखी आणि तोंडी मागणी करूनही सातत्याने दुर्लक्ष होते आहे. याबाबत नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
या विभागात गाई, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्या असे पशुधन मोठ्या प्रमाणात असून, त्यांना वेळोवेळी करावे लागणारे लसीकरण आणि उपचारांसाठी लोकांना मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होत आहे. जनावरांवरील वैद्यकीय उपचारांसाठी डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक वेळा जनावरे दगावण्याचेही प्रकार झाले असल्याचे येथील लोकांचे म्हणणे आहे.
ऐनवेळी शेळ्या, मेंढ्या अथवा इतर जनावरांना उपचार करण्यासाठी बाजूच्या गावांत असणाऱ्या डॉक्टरांना बोलावून घ्यावे लागते. तेही वेळेत उपलब्ध होतीलच असे नाही.
गेल्या सहा ते सात महिन्यांपासून येथील धनगर समाजातील पाच ते सहा मेंढपाळांच्या २२ मेंढ्या अज्ञात आजाराने दगावल्या आहेत. त्यामुळे जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बिरूदेव कृष्णात गाढवे यांच्या सहा मेंढ्या, शिवाजी गाढवे यांच्या पाच मेंढ्या, लक्ष्मण मोरे यांच्या तीन ३ मेंढ्या, विलास संपत मोरे यांच्या ४ मेंढ्या, रामचंद्र रघुनाथ चोरामले यांच्या ४ मेंढ्या असे या सर्वांचे नुकसान झाले आहे.
हेळगाव पशुवैद्यकीय केंद्राचा कार्यभार असणारे डॉक्टर भाऊसाहेब ठोंबरे हे सध्या पेरले येथे कामकाजास आहेत. त्यांना फोनवरून विचारले असता ते म्हणाले, माझ्याकडे हेळगावअंतर्गत १२ गावे आणि पेरलेअंतर्गत चार गावे अशा सोळा गावांचा कार्यभार आहे. यामुळे कामकाजात अडचणी येत आहेत.
कोट
हेळगाव पशुवैद्यकीय केंद्राला कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी मिळण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव आणि मागणीचे पत्र पालकमंत्री सहकार व पणनमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांना तातडीने देण्यात येणार आहे.
संजय सूर्यवंशी,
उपसरपंच, हेळगाव ग्रामपंचायत