‘हॅलोऽऽ मी आंध्रप्रदेशात चित्तूरला पोहोचले!’ लेकरासह बेपत्ता पत्नीचा फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:06 AM2018-07-24T00:06:34+5:302018-07-24T00:07:59+5:30
पाच महिन्यांच्या लेकरासह पत्नी गायब झालेली... ते रेल्वेतून गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झालेलं... त्या आधारेच कुटुंबीयांनी अनेक रेल्वेस्थानकंपालथी घातली... अन् सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास पतीच्या मोबाईलची रिंग वाचली.
सातारा : पाच महिन्यांच्या लेकरासह पत्नी गायब झालेली... ते रेल्वेतून गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झालेलं... त्या आधारेच कुटुंबीयांनी अनेक रेल्वेस्थानकंपालथी घातली... अन् सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास पतीच्या मोबाईलची रिंग वाचली. ‘हॅलोऽऽऽ मी बोलतेय, आम्ही आंध्रप्रदेशातल्या चित्तूरला पोहोचलेय, आम्हाला न्यायला या!’ हे शब्द कानावर पडले अन् पतीसाठी आभाळच ठेंगणं झालं. त्याच अवस्थेत त्यांनी आंध्रप्रदेशाकडं धाव घेतली.
साताºयातील सदरबझार येथील राहत्या घरातून युगंधरा रत्नदीप पवार (वय २६) या मंगळवार, दि. १७ रोजी पहाटे पाचच्या सुमारास पाच महिन्यांच्या रणवीर मुलासह गायब झाल्या. हे लक्षात आल्यावर कुुटुंबीयांनी दुपारपर्यंत परिसरात शोध घेतला. त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात जाऊन दोघे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलीस त्यांच्या पद्धतीने शोध घेत होते.
केवळ पोलिसांच्या तपासावर अवलंबून न राहता पती रत्नदीप यांनी त्यांच्या पद्धतीने शोध सुरूच ठेवला. सर्वप्रथम नातेवाईक, मित्रमंडळींना फोन करून ते आले आहेत का? याची विचारणा केली. सकारात्मक माहिती न मिळाल्यानंतर त्यांनी घर परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. एक-एक करत त्यांना हे दोघेही सातारा रेल्वे स्टेशनकडे गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी रेल्वे व्यवस्थापनाला त्या दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज दाखविण्याची विनंती केली. प्रशासनानेही मदत केली असता हे माय-लेकरं मुंबई-अजमेर रेल्वेत बसले असल्याचे लक्षात आले.
दोघांच्याही तपासासाठी रेल्वे हाच एकमेव धागा उरला होता. रत्नदीप, भाऊ मनिष यांनी कोल्हापूरच्या बाजूचे सर्व रेल्वेस्थानके पालथी घातली; पण तपास लागत नव्हता.
त्याबरोबरच दोघांचेही फोटो सोशल मीडियावर टाकून शोध सुरू केला. युगंधराचे महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात झालेले. तेथे जाऊन त्यांच्या बॅचमेटच्या सर्व मुला-मुलींची नावे, मोबाईल नंबर शोधून काढली. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी या दोघांना पाहिले आहे का? याची विचारणा करत होते; पण हाती काहीच लागत नव्हते. त्यामुळे निराश अवस्थेत ते सोमवारी ‘लोकमत’ कार्यालयात आले. त्याचवेळी त्यांच्या मोबाईलवर युगंधरा यांचा फोन आला. ‘आम्ही आंध्रप्रदेशातील चित्तूरला आलो आहोत. आम्हाला न्यायला या,’ असे सांगितले.’ हे शब्द ऐकल्यानंतर काय करावे, हेच कळत नव्हतं. लागलीच चारचाकी वाहनाचा शोध घेऊन भावंडे चित्तूरकडे रवाना झाले.
मिरज रेल्वेस्थानकातील फलाटावर बारा तास
पवार भावंडे जिल्ह्यातील एक-एक रेल्वे स्टेशनमध्ये शोध घेत मिरजमध्ये पोहोचले. तेथेही रेल्वे प्रशासनाला विनंती करून त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज दाखविण्याची विनंती केली. प्रशासनाने यांची भावनिक अवस्था लक्षात घेऊन सीसीटीव्ही फुटेज दाखविले. त्यातील दृश्य पाहून सर्वांना हादराच बसला. युगंधरा अन् पाच महिन्यांचे रणवीर हे दोघेही तब्बल बारा तास फलाटावरच होते. अधूनमधून या फलाटावरून दुसºया फलाटावर जात होते.