अपघातात वडील गमावलेल्या विकासकडून हेल्मेटची विनंती
By admin | Published: February 12, 2016 09:52 PM2016-02-12T21:52:01+5:302016-02-12T23:45:37+5:30
सोशल व्हेलेंटाईन : चिमुड्यांनी दिले दुचाकीस्वारांना गुलाबपुष्प
कऱ्हाड : अपघातात ज्या कुटुंबानं आपला जिवाभावाचा माणूस गमावला त्या कुटुंबालाच अपघाताचं दु:ख जाणवतं. मात्र, या दु:खाची प्रत्येकालाच जाणीव व्हावी, यासाठी शुक्रवारी शाळकरी मुली चक्क रस्त्यावर उतरल्या. महामार्गावरून विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना थांबवून त्यांनी त्यांच्या हातात गुलाबपुष्प ठेवलं. ‘दादा... हेल्मट वापर, आई, बाबा घरी तुझी वाट पाहतायंत,’ असं भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केलं. दुचाकीच्या अपघातात आपले वडील गमावलेला विकास गंगावणे हा मलकापुरातील युवकही चळवळीत सहभागी झाला. ‘लोकमत’च्या वतीने सध्या ‘सोशल व्हॅलेंटाईन’ ही चळवळ राबविली जात आहे. या चळवळीत सामान्य नागरिकासह, शासकीय नोकरदार व पोलीसही सहभागी झालेत; पण आज हौसाई कन्या शाळेतील मुलींनीही या चळवळीत सहभाग घेत ‘हेल्मेट’विषयी जागृती केली.महामार्गावर दररोज अवजड वाहनांसह चारचाकी तसेच दुचाकींचीही मोठी वर्दळ असते. या वर्दळीत एखादी दुर्घटना घडली की, त्यामध्ये हमखास दुचाकीस्वारालाच आपला जीव गमवावा लागतो. अपघातात डोक्याला दुखापत झालीच तर ती संबंधिताच्या जिवावर बेतते. सध्या दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीचे केले असले तरी अनेकांनी ते गांभीर्याने घेतलेले नाही.या पार्श्वभूमीवर मुलींनी हेल्मेटविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)
महामार्गावर होणाऱ्या बहुतांश अपघातात हेल्मेट नसल्यानेच दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागतो. हेल्मेट वापराविषयी आम्ही कितीही विनंती केली तरी दुचाकीस्वार ते फारसं मनावर घेत नाहीत. मात्र, आज शाळकरी मुलींनी केलेली जागृती हा कौतुकाचा विषय आहे. ‘लोकमत’ने राबविलेल्या या चळवळीला शुभेच्छा आणि आभार.
- ए. पी. सिद, सहायक पोलीस निरीक्षक
महामार्ग पोलीस मदत केंद्र, कऱ्हाड
विकासनं मांडलं दु:ख
विकासच्या वडिलांचा काही महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला आहे. दुचाकी दुभाजकाला धडकून डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कुटुंबावर कोसळलेलं दु:ख विकासने दुचाकीस्वारांसमोर मांडलं. तुमच्याही घरचे तुमची वाट पाहत असतील. त्यांच्यासाठी तरी हेल्मेट वापरा,’ असं आवाहन विकासनं केलं.
‘सोशल व्हॅलेंटाईन’चं सर्वांनाच अप्रूप
महामार्ग पोलीस कोल्हापूर नाक्यावर दुचाकीस्वारांना अडवित असल्याचे दिसताच अनेकांना ही कारवाईची मोहीम असावी, असं वाटलं; पण हातात गुलाबपुष्प घेऊन पुढे सरसावलेल्या शाळकरी मुली पाहताच सर्वांची उत्सुकता वाढली. एसटीतून प्रवास करणारेही खिडकीतून बाहेर डोकावले. मुलींनी दुचाकीस्वारांना गुलाबपुष्प देऊन हेल्मेट वापरण्याचं केलेलं आवाहन यावेळी अनेकांना भावलं. कोल्हापूर नाका परिसरात ‘लोकमत’च्या या ‘सोशल व्हॅलेंटाईन’ची दिवसभर चर्चा होती. या मोहीमेबद्दल पालकांतूनही आनंद व्यक्त होत होता.