प्रियकराच्या मदतीने आईनेच केला मुलाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 08:38 PM2019-05-08T20:38:26+5:302019-05-08T20:41:58+5:30
प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने आईने आपल्या पोटच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याची खळबळजनक घटना वाई तालुक्यातील नावेचीवाडी येथे तब्बल दहा दिवसांनंतर उघडकीस आली
वाई: प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने आईने आपल्या पोटच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याची खळबळजनक घटना वाई तालुक्यातील नावेचीवाडी येथे तब्बल दहा दिवसांनंतर उघडकीस आली. या घटनेनंतर पोलिसांनी प्रियकर आणि संबंधित महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
गौरव प्रकाश चव्हाण (वय १०, रा़ वृंदावन कॉलनी, नावेचीवाडी, वाई) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. अश्विनी प्रकाश चव्हाण (वय २८), प्रियकर सचिन शिवराम कुंभार (वय ४१, रा़ बावधन ता़ वाई) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, गंगापुरी येथील यात्रा मैदानावर रविवार, दि. २८ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता मनोरंजनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गौरव गेला होता़ सोमवार दि. २९ एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सूमारास धोम डाव्या कालव्यात देगाव परिसरातील नागरिकांना एका मुलाचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी जावून खात्री केली असता हा मृतदेह गौरवचा असल्याचे स्पष्ट झाले़ मात्र, गौरव तेथे कसा गेला, हे तपासात पुढे आले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी गौरवच्या आईकडे कसून तपास केला असता अश्विनी चव्हाण ही विसंगत माहिती देत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. परिणामी पोलिसांनी अश्विनीवरच तपास केंद्रीत केला. तिच्या फोनवर आणि हालचालीवर लक्ष ठेवल्यानंतर अश्विनीचा प्रियकर असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी प्रियकर सचिन कुंभार याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या त्याला दाखविताच गौरवच्या खुनाचे गूढ उलगडले.
अश्विनी चव्हाण व तिचा प्रियकर वाई औद्योगिक वसाहतीत एकाच कंपनीत कामाला होते़ या ठिकाणी दोघांचे प्रेमसंबंध जुळले. प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने सचिन हा पतीला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी अश्विनीजवळ देत होता़ यातूनच दोघांनी गौरवचा काटा काढण्याचा डाव आखला. कार्यक्रम संपल्यानंतर आई आणि प्रियकाराने गौरवला रात्री साडेदहा वाजता दीड किलोमीटर अंतरावर असणाºया शेलारवाडी रोडवरील धोम डाव्या कालव्यावर नेले. या ठिकाणी थंड पेयात गुंगीचे औषध दिल्यानंतर प्रियकर सचिनने त्याला पाण्यात ढकलले. या प्रकारानंतर दोघेही घरी गेले. दुसºया दिवशी सकाळी गौरवचा मृतदेह नागरिकांना आढळून आला होता.
दरम्यान, वाई न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़
जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदराव खोबरे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र निबांळकर, राजेंद्र कदम, त्रिबंक अहिरेकर, कृष्णा पवार, प्रशांत शिंदे, सोमनाथ बल्लाब, ओंकार गरूड, शिवाजी जाधव, हणमंत दडस यांनी ही कारवाई केली.