पानवणकरांच्या तुफानाला पुणेकरांची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 11:22 PM2019-05-05T23:22:56+5:302019-05-05T23:23:01+5:30
म्हसवड : दुष्काळ हद्दपार करण्याचा निर्धार करून पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत उतरलेल्या पानवणकरांनी गावात श्रमदानाचे ...
म्हसवड : दुष्काळ हद्दपार करण्याचा निर्धार करून पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत उतरलेल्या पानवणकरांनी गावात श्रमदानाचे तुफान आणले आहे. या तुफानाला गावाबाहेरील लोकांचीही चांगली साथ लाभत असून, पुणे येथील सामर्थ्य वाद्यवृंद ग्रुप आणि शिवगृहिणी महिला बचत गटाच्या सुमारे ६० सदस्यांनी श्रमदानात सहभाग घेतला आणि स्पर्धेसाठी आर्थिक योगदानही दिले.
सामाजिक कार्यात नेहमीच एकोपा दाखविणाऱ्या पानवणकर ग्रामस्थांनी यावर्षी मोठ्या उत्साहात वॉटर कप स्पर्धेची सुरुवात केली आहे. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने स्पर्धेपूर्वीच्या शिवार फेरी, परसबाग, मातीपरीक्षण आदी ३० पैकी ३० गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या प्रारंभाला ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील हीट जोडी अंजली आणि राणा यांनीही उपस्थिती लावली होती.
स्पर्धेच्या सुरुवातीपासून आजपर्यंत दररोज सुमारे सातशे लोक नियमित श्रमदानाला उपस्थिती दर्शवत असून, सुटीदिवशी नोकरदार मंडळीही श्रमदानाला उपस्थित राहत आहेत.
या पार्श्वभूमीवर पुणे येथील सामर्थ्य वाद्यवृंद ग्रुप आणि शिवगृहिणी महिला बचत गटाच्या सदस्यांनी स्वखर्चाने पुणे ते पानवण असा सुमारे दीडशे किलोमीटरचा प्रवास करून सकाळी सात ते नऊ असे दोन तास श्रमदान केले. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी यांत्रिक कामाच्या खर्चासाठी निधी अपुरा पडत असल्याचे पाहून सुमारे पंधरा हजार रुपयांचा कर्तव्य निधी पाणी फाउंडेशन, पानवणच्या टीमकडे सुपूर्द केला. पुणेकरांच्या या सहकार्याने पानवणकर अक्षरश: भारावून गेले.