छोट्या व्यावसायिकांना मदत द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:40 AM2021-05-09T04:40:07+5:302021-05-09T04:40:07+5:30
कऱ्हाड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही केलेल्या लॉकडाऊनमुळे ऐन व्यवसायाच्या दिवसात विवाहासह जाहीर समारंभावर बंदी आलेली आहे. त्यामुळे मंडप व्यावसायिकांसह ...
कऱ्हाड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही केलेल्या लॉकडाऊनमुळे ऐन व्यवसायाच्या दिवसात विवाहासह जाहीर समारंभावर बंदी आलेली आहे. त्यामुळे मंडप व्यावसायिकांसह यावर अवलंबून असणाऱ्यांची उपासमार सुरु आहे. याबाबत सरकारने विचार करावा आणि या व्यावसायिकांना मदत द्यावी अशी मागणी ऑल महाराष्ट्र स्टेट डीलर्स ऑर्गनायझरचे सातारा जिल्हा प्रतिनिधी गोरख करपे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,डेकोरेटर्ससह अनुषंगिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना सावरण्यासाठी शासकीय पातळीवर मदत करण्याचे धोरण ठरविण्याची गरज आहे. लॉकडाऊनमुळे लग्नसराईचा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे भांडवल गुंतवलेले व्यावसायिक आर्थिक अडचणीत आहेत. त्यांच्यावर कर्ज काढण्याची वेळ आली आहे.
सातारा जिल्ह्यात एकूण मंडप व्यावसायिक १ हजार ८०० आहेत. लग्नाच्या कार्यक्रमावर अवलंबून असणारे आचारी, केटरर्स, बँड, बँजो, डीजे, डोलीवाले, तुतारी वादक, फोटोग्राफर, फुलवाले, भाजी मंडईवाले, वाढपी, मेकअपवाले, सलूनवाले अशा प्रकारचे सुमारे ११० व्यावसायिक आहेत. या सर्व व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सर्व व्यावसायिक या कोरोना महामारीच्या लढाईत सरकार बरोबर आहोत. सरकारने या सर्वांचा विचार करणे गरजेचे आहे.