कोरोनात प्रशासनाला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:26 AM2021-07-10T04:26:37+5:302021-07-10T04:26:37+5:30
कऱ्हाड : येथील प्राणवायू ग्रुप व श्रीनिवास पाटील फाऊंडेशनतर्फे दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन, वीस ऑक्सिमीटर व अन्य आरोग्य साहित्य ...
कऱ्हाड : येथील प्राणवायू ग्रुप व श्रीनिवास पाटील फाऊंडेशनतर्फे दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन, वीस ऑक्सिमीटर व अन्य आरोग्य साहित्य देण्यात आले आहे. सातारा येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे हे साहित्य देण्यात आले.
श्रीनिवास पाटील फाऊंडेशनतर्फे कोरोनामुळे उद्भवलेल्या कठीण काळात नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत मूळचे सातारचे असलेले परंतु सध्या अमेरिकेत कार्यरत असलेले प्रकाश खोत यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी आपल्या मित्रांच्या साथीने स्थापन केलेल्या प्राणवायू ग्रुपच्या माध्यमातून श्रीनिवास पाटील फाऊंडेशनच्या सहकार्याने ही मदत केली. यामध्ये दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन, वीस ऑक्सिमीटर, वीस डिजिटल थर्मामीटर, पीपीई किट, हातमोजे आणि मास्क या आरोग्य साहित्याचा समावेश आहे. सातारा येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी सारंग पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते.
दरम्यान, उपलब्ध झालेली ही वैद्यकीय उपकरणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांमधील प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा स्थानिक ग्रामपंचायतींच्या विलगीकरण कक्षासाठी गरज असेल त्याठिकाणी देण्यात यावीत, अशी सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रशासनाला केली. यावेळी पदाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
फोटो : ०९ केआरी ०१
कॅप्शन : सातारा येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे आरोग्य साहित्य सुपूर्द करण्यात आले.