नागठाणेत अपघातातील जखमीला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:37 AM2021-05-16T04:37:48+5:302021-05-16T04:37:48+5:30
नागठाणे : एखाद्या अपघातानंतर जखमींना मदतीचा हात देण्याच्या घटना आता दिवसेंदिवस दुर्मीळ होताना दिसतात. अशा स्थितीत येथे झालेल्या अपघाती ...
नागठाणे : एखाद्या अपघातानंतर जखमींना मदतीचा हात देण्याच्या घटना आता दिवसेंदिवस दुर्मीळ होताना दिसतात. अशा स्थितीत येथे झालेल्या अपघाती घटनेत निनाम (ता. सातारा) येथील प्रदीप जाधव जखमीच्या मदतीला तत्परतेने धावून आले.
कोरेगाव येथील शिवाजी चव्हाण हे स्थापत्य आभियांत्रिकी विभागात नोकरीस आहेत. इंदोली येथे सुरू असलेले खात्याचे कामकाज उरकून ते दुचाकीवरून आपल्या घरी परत निघाले होते. त्याच दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यात नागठाण्यानजीक त्यांची दुचाकी घसरली. चव्हाण हे रस्त्यावर पडले. त्यांना जोराचा मार लागला. ये-जा करणाऱ्या काहींनी जखमी अवस्थेतील चव्हाण यांना पाहूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्या दरम्यान निनाम येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप दिनकर जाधव हे घटनास्थळाहून निघाले होते. ही घटना पाहताच त्यांनी चव्हाण यांना मोलाची मदत केली. इतकेच नव्हे, तर त्यांना उपचारासाठी घेऊन ते सातारा येथे गेले.
अपघातानंतर चव्हाण यांचे किमती घड्याळ घटनास्थळी पडले होते. याबाबतची माहिती मिळताच प्रदीप जाधव हे पुन्हा नागठाण्यात आले. त्यांनी चोैकशी केली असता, हे घड्याळ येथील मिठाई व्यावसायिक कुलदीप राजपुरोहित यांना सापडले होते. ते त्यांनी प्रामाणिकपणे चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले. प्रदीप जाधव यांनी यापूर्वीही विविध ठिकाणी झालेल्या अपघातातील जखमींना वेळोवेळी मदत केली आहे. गावातील सामाजिक कार्यातही ते सातत्याने आघाडीवर असतात. याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते त्यांना गोैरविण्यातही आले आहे. जखमीस तत्परतेने मदत केल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे कोैतुक होत आहे.