शिंदेवाडी विभागात रानडुकरांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:57 AM2021-02-23T04:57:13+5:302021-02-23T04:57:13+5:30
विंगसह शिंदेवाडी परिसरात वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. प्रतिवर्षी खरीप हंगामानंतर रब्बीतील पिकांना वन्यप्राण्यांकडून लक्ष्य केले ...
विंगसह शिंदेवाडी परिसरात वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. प्रतिवर्षी खरीप हंगामानंतर रब्बीतील पिकांना वन्यप्राण्यांकडून लक्ष्य केले जाते. कधी कोवळ्या तर कधी हाता-तोंडाला आलेल्या पिकांवर वन्यप्राणी डल्ला मारतात. त्यांच्याकडून मोठे नुकसान केले जाते. मोकाट गाईंसह रानडुक्कर, साळिंदर आदी वन्यप्राण्यांकडून या विभागात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जाते. प्राण्यांकडून वारंवार होणाऱ्या या उपद्रवामुळे शेतकरी अक्षरश: हैराण झाले आहेत. संकरित ज्वारीसह गहू, मका आदी पिकांना त्यांनी लक्ष्य करून त्याचे नुकसान केले आहे. रानडुकरांच्या कळपाने शिंदेवाडी परिसरातील उभ्या ज्वारीवर हल्ला चढवला आहे. पंधरवड्यात या परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डुकरांचे कळप शिवारात वास्तव्य करून आहेत. काढणीला आलेली ज्वारी रातोरात ते उद्ध्वस्त करीत आहेत. त्यामुळे उत्पादकांचा तोंडचा घास हिरावून घेतला जात आहे. ठिकठिकाणी पिके अक्षरश: जमीनदोस्त केली आहेत. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
हिंदुराव पांडुरंग शिंदे, बाबूराव शिंदे, संतोष आनंदा शिंदे, विजय शिवाजी शिंदे, वसंत रामचंद्र शिंदे, अशोक श्रीरंग शिंदे, तानाजी रामचंद्र शिंदे, सचिन शिंदे आदी शेतकऱ्यांच्या ज्वारीचे, तर उत्तम दादू शिंदे यांच्या गहू पिकाचे रानडुकरांनी मोठे नुकसान केले आहे.
या नुकसानीमुळे शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. वन विभागाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.