इथे महिलाच काठीने मारतात डुकरांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:32 AM2019-07-02T00:32:18+5:302019-07-02T00:34:28+5:30
साताऱ्यात एकदा पाऊस सुरू झाला तर थांबायचे नावच घेत नाही. त्यातच परिसरात अस्वच्छता असल्यास रोगराई पसरण्याचा धोका अधिक असतो. सदरबझार परिसरात भटकी कुत्रे, डुकरांची संख्या प्रचंड वाढली आहे.
जावेद खान ।
सातारा : साताऱ्यात एकदा पाऊस सुरू झाला तर थांबायचे नावच घेत नाही. त्यातच परिसरात अस्वच्छता असल्यास रोगराई पसरण्याचा धोका अधिक असतो. सदरबझार परिसरात भटकी कुत्रे, डुकरांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुटुंबीयांचे आरोग्य जपण्यासाठी महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. हातात काठी घेऊन त्या डुकरांना पिटाळताना दिसत आहेत.
सदरबझार येथील शिंपी गल्लीत डुकरं आणि कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पालिकेला सांगूनही उपाययोजना होत नसल्याने अखेर येथील महिलांनीच कुटुंब निरोगी राहण्यासाठी हातात काठ्या घेऊन डुकरांना पिटाळण्याचे काम सुरू केले आहे. पालिका प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सदर बझार येथील तीन ते चार नागरिकांना गेल्या वर्षी स्वाईन फ्लूने जीव गमवायला लागला होता. त्यामुळे या परिसरात डुकरांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये रोगराईची धास्ती निर्माण झाली आहे. याबाबत पालिकेला वारंवार सांगूनही उपाययोजना केल्या जात नाहीत. सातारा पालिकेला कोणतेच गांभीर्य नसल्याचा आरोप केला जात आहे. शिंपी गल्लीतील गल्ली बोळात डुकरांचा व कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे.
सिक्युरिटी गार्ड नेमणार !
पालिकेकडून आरोग्याविषयी कोणतीच उपाययोजना होत नसेल तर पालिकेची घरपट्टी न भरता या रकमेतून येथे डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी सिक्युरिटी गार्ड नेमण्याचा संकल्प करण्यात येणार असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
भांडी दिली फेकून
अंगणात भांडी घासताना भांड्यात डुकरे तोंड घालतात, त्यामुळे अनेकांनी भांडी फेकून दिली आहेत. तर काही जनावरे तर घरात घुसून भांड्यात तोंड घालतात.
भटक्या जनावरांविषयी पालिकेला कळविले आहे. लवकरच संबंधित डुकरांच्या मालकांना नोटीस काढण्यात येणार आहे. तसेच सर्वत्र बंदिस्त गटार झाल्याने डुकरांना खायला मिळत नाहीत. नागरिकांनी घंटागाडीत खरकटे टाकल्यास हा त्रास कमी होईल.
-विशाल जाधव, नगरसेवक, सातारा