‘हायटेक’ सुविधा चक्क कुलूपबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:03+5:302021-07-15T04:27:03+5:30

मलकापूर : कोरोनाची गंभीर स्थिती असतानाही ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’साठी मलकापूरने कंबर कसली आहे. त्यासाठी शहरात ‘हायटेक’ स्वच्छतागृह बनविण्यात आली ...

'Hi-tech' facility locked! | ‘हायटेक’ सुविधा चक्क कुलूपबंद!

‘हायटेक’ सुविधा चक्क कुलूपबंद!

Next

मलकापूर : कोरोनाची गंभीर स्थिती असतानाही ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’साठी मलकापूरने कंबर कसली आहे. त्यासाठी शहरात ‘हायटेक’ स्वच्छतागृह बनविण्यात आली आहेत. सर्व सोयींनीयुक्त अशा या स्वच्छतागृहांची सुविधा ठिकठिकाणी केली आहे. त्यामुळे नागरिक व प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. मात्र, ही सोयच अनेक दिवसांपासून कुलपात बंद असल्यामुळे ती नागरिकांच्या सेवेत केव्हा येणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्वच्छ सर्वेक्षणच्या अनुषंगाने पालिका स्वच्छतेबाबत विविध उपक्रम राबवत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने नव्याने अकरा मोड्युलर शौचालय बनवली आहेत. त्यापैकी पाच महिलांसाठी तर सहा पुरुषांसाठी आहेत. ढेबेवाडी फाट्यावर कृष्णा रुग्णालयाच्या भिंतीलगत चार आधुनिक स्वच्छतागृह बसविण्यात आली आहेत. त्यापैकी दोन महिलांसाठी तर दोन पुरुषांसाठी आहेत. याच परिसरात महामार्ग पोलीस मदत केंद्राशेजारी महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी एक-एक, अहिल्यानगर येथील नवीन भाजी मंडईमध्ये दोन पुरुष व एक महिलांसाठी अशी तीन तर आगाशिव नगर येथे इमर्सन कंपनीशेजारी दोन स्वच्छतागृह उभारली आहेत.

पालिकेने शहरामध्ये डी-मार्ट, अहिल्या नगर, लक्ष्मी नगर व आगाशिव नगर झोपडपट्टी या परिसरामध्ये चार बेस्ट स्वच्छतागृहांची निर्मिती केली आहे. त्यामध्ये कमोड सुविधा तसेच अपंगांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. ही स्वच्छतागृह बीओटी तत्त्वावर चालविण्यात येत असून, त्यामधून पालिकेला उत्पन्न मिळत आहे. प्रतिव्यक्ती पाच रुपयेप्रमाणे दर ठेवला आहे. या स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन, पॅड, एटीएम, हँड ड्रायर, पाणी, लाईट, मशीन आदी सोयी केल्या आहेत. तसेच फीडबॅक मशीनही बसवली आहेत. याव्यतिरिक्त शहरात ११ मॉड्युलर व लहान मुलांसाठी दोन ‘बेबी टॉयलेट’ बनविण्यात आले आहेत. मात्र, ही शौचालये बांधल्यापासून कुलपातच बंद आहेत. ती नागरिकांसाठी केव्हा खुली होणार? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

- चौकट

अठरा ठिकाणी स्वच्छतागृह

१) बेस्ट स्वच्छतागृह : ४

२) मोड्युलर स्वच्छतागृह : ११

३) मोबाईल स्वच्छतागृह : १

४) बेबी स्वच्छतागृह : २

- चौकट

‘मॉड्युलर’ स्वच्छतागृहांमधील सुविधा

१) पुरेशा पाण्याची व्यवस्था

२) विजेची व्यवस्था

३) वॉश बेसीननजीक व्हेंटिलेशन

४) स्टेनलेस स्टील बॉडीचे टॉयलेट

- चौकट

सार्वजनिक ठिकाणी पाहुण्यांची सोय

शहरात बसविलेल्या स्वच्छतागृहांमुळे शिवछावा चौकात ढेबेवाडी खोऱ्यातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची, महामार्ग पोलीस, अहिल्यानगर येथील नवीन भाजी मंडई, आगाशिव नगर येथे इमर्सन कंपनीत व डी-मार्टमध्ये येणाऱ्या नागरिकांची सोय झाली आहे.

फोटो : 14 केआरडी 02

ओळी : मलकापूर येथे ठिकठिकाणी उभारलेली आधुनिक स्वच्छतागृह कुलूपबंद असून, वापराविना पडून आहेत.

Web Title: 'Hi-tech' facility locked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.