महिला अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती नेमावी : वन कर्मचारी संघटनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:40 AM2021-03-31T04:40:09+5:302021-03-31T04:40:09+5:30
सातारा : विनोद शिवकुमार व रेड्डी यांना तत्काळ बडतर्फ करावे तसेच दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास आयपीएस दर्जाच्या महिला ...
सातारा : विनोद शिवकुमार व रेड्डी यांना तत्काळ बडतर्फ करावे तसेच दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास आयपीएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीमार्फत करावा, अशी मागणी महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेच्या सातारा शाखेने केली आहे.
या मागणीचे निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामध्ये म्हटले आहे की, दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणातील जबाबदार उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार व प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ करावे. दीपाली चव्हाण यांना मरणानंतर तरी जलद न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. त्यासाठी उज्ज्वल निकम किंवा विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करावी. दीपाली चव्हाण यांना देय सरकारी लाभ ७ दिवसांत तिच्या आईला द्यावेत. चव्हाण कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची सरकारी मदत जाहीर करावी.
दोन्ही अधिकाऱ्यांवर त्वरित विभागीय चौकशी सुरू करावी. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक विशाखा समिती स्थापन न केल्याबद्दल दोन्ही अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आदी मागण्याही निवेदनाद्वारे केल्या आल्या आहेत.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पडवळ, सचिव सुहास भोसले, आनंद सावंत, सुनील लांडगे, जगदीश मोहिते, बाळासाहेब जगदाळे, राजकुमार मोसलगी, वनपाल पावरा आदी उपस्थित होते.