यंदाही उसाला उच्चांकी भाव : शिवेंद्रसिंहराजे

By admin | Published: September 28, 2016 12:09 AM2016-09-28T00:09:14+5:302016-09-28T00:24:03+5:30

अजिंक्यतारा कारखाना वार्षिक सभा : सभासदांच्या पाठिंंब्यामुळेच संस्था प्रगतिपथावर

High-quality sugarcane prices: Shivendra Singh Maharaj | यंदाही उसाला उच्चांकी भाव : शिवेंद्रसिंहराजे

यंदाही उसाला उच्चांकी भाव : शिवेंद्रसिंहराजे

Next

सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना आज पूर्णपणे कर्जमुक्त आहे. स्वयंपूर्ण झालेल्या आपल्या कारखान्याने शेतकऱ्यांना नेहमीच उच्चांकी दर दिला असून, आगामी काळातही उच्चतम ऊसदर देण्यासाठी कारखाना कटिबद्ध आहे,’ असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
शेंद्रे, ता. सातारा येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव सावंत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सतीश चव्हाण, सदस्य किरण साबळे- पाटील, जितेंद्र सावंत, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सदस्य किशोर ठोकळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे, रवींद्र कदम, अजिंक्यतारा सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष रामचंद्र जगताप, उपाध्यक्ष हणमंत देवरे, ज्येष्ठ संचालक अ‍ॅड. लालासाहेब पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘कारखान्यात साखरेचे दर्जेदार उत्पादन होत असल्याने साखरेला पेप्सीको, डी- मार्ट व इतर औद्योगिक संस्था व कंपन्यांकडून साखरेला चांगली मागणी आहे. वेळेत साखर विक्री होत असल्याने व्याजात बचत होत आहे. कारखान्यातील डिस्टिलरी प्रकल्पाला ३ कोटी ६९ लाख एवढा नफा झालेला आहे. १० हजार लिटर्स क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाचे आधुनिकीकरण करून प्रतिदिन ३० हजार लिटर्स क्षमतेचा मोलेक्युलर सिव्ह डिहाड्रेशन सिस्टीमचा इथेनॉल अ‍ॅब्सुल्यूट अल्कोहोल प्रकल्प उभारण्यात आला आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पात गत हंगामात ७ कोटी ३७ लाख ७० हजार ८० युनीट वीजनिर्र्मिती झाली असून, त्यापैकी ४ कोटी ९८ लाख ३६ हजार ६९४ युनीट विजेची निर्यात करण्यात आली आहे.
यावेळी विक्रमी ऊस उत्पादन करणाऱ्या १२ शेतकऱ्यांचा आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी अहवाल व विषय वाचन केले. कारखान्यचे उपाध्यक्ष अशोक शेडगे यांनी आभार मानले. सभेला कारखान्याचे सर्व संचालक, अजिंक्य उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)


मराठा क्रांती महामोर्चाच्या यशस्वीतेसाठी कमी पडू नका
‘दरम्यान, दि. ३ आॅक्टोबर रोजी काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती महामोर्चासाठी कारखान्यातील कामगारांना सुटी देण्यात आली आहे. छत्रपतींची गादी असलेल्या मराठ्यांच्या राजधानीत निघणाऱ्या या महामोर्चात सर्व सभासद, शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे,’ असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. ‘हा महामोर्चा कोणत्याही जाती, धर्माच्या विरोधात नाही तर मराठ्यांच्या न्याय, हक्कासाठी आहे. आर्थिक निकषावर मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. ही भूमिका आमची असून, मराठा क्रांती महामोर्चा यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण कुठेही कमी पडणार नाही. मराठ्यांची ताकद दाखविण्यासाठी सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावे,’ असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सभेत केले. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात जोरदार प्रतिसाद दिला.

Web Title: High-quality sugarcane prices: Shivendra Singh Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.