दुर्गम भागात प्रशासनाची हायटेक तयारी- दोन टॉवरची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 02:25 PM2019-04-16T14:25:16+5:302019-04-16T14:27:12+5:30
जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग दुर्गम आहे. पाटण, महाबळेश्वर, जावळी या तालुक्यांतील अनेक गावांत मोबाईलला रेंज मिळत नाही, लोकसभा निवडणुकीच्या
सातारा : जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग दुर्गम आहे. पाटण, महाबळेश्वर, जावळी या तालुक्यांतील अनेक गावांत मोबाईलला रेंज मिळत नाही, लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात, हे ओळखून निवडणूक विभागाने दुर्गम भागात हायटेक तयारी केली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाचा पश्चिम भाग अत्यंत दुर्गम आहे. जंगलव्याप्त असणाºया या परिसरात मोबाईलला रेंज मिळत नाही. सुगम भागाशी संपर्कही साधणे कठीण असते. लोकसभा निवडणुकीचे मतदान २३ एप्रिल रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, प्रशासनात सुसुत्रता कायम राहावी, या उद्देशाने प्रशासनाने पावले उचलली आहेत.
जावळी तालुक्यातील देवळीमुरा, उत्तरेश्वर या गावांमध्ये बीएसएनलच्या माध्यमातून मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. या भागात ड्युटी लागलेल्या कर्मचाºयांना बीएसएनएलचे सीम कार्ड घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण ५५ गावांमध्ये वायरलेस यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. पाटण तालुक्यातील १८, महाबळेश्वर तालुक्यातील २७ व जावळी तालुक्यातील १0 गावांमध्ये वायरलेस यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. पोलीस अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी, तहसीलदार यांच्यासाठी वॉकी टॉकी देण्यात येणार आहे.
ही सर्व यंत्रणा कार्यरत ठेवण्यात येणार असली तरीसुध्दा अधिकची दक्षता म्हणून वाहनधारी रनर्सची नेमणूकही करण्यात येणार आहे. ऐनवेळी सर्व यंत्रणा कोलमडली तरी दुचाकीवरुन सर्व निरोप जवळचे पोलीस स्टेशन व तहसीलदार कार्यालयाला पोहोचवता येणार आहेत. मोबाईल टॉवरचे टेस्टिंग रिपोर्ट मिळाल्यानंतर खºया अर्थाने ही सर्व यंत्रणा किती उपयोगाची आहे, याबाबत अंदाज बांधणे सोपे जाणार आहे.
मतदानादिवशी दुर्गम भागात अडचणी टाळण्यासाठी निवडणूक विभागाने ही सतर्कता बाळगली आहे. दुर्गम भागात कार्यरत असणाºया निवडणूक अधिकारी, कर्मचाºयांना वॉकी टॉकीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- रेखा सोळंकी, नोडल आॅफीसर निवडणूक