महामार्ग प्रशासनाला आली जाग..!
By admin | Published: December 17, 2014 10:03 PM2014-12-17T22:03:13+5:302014-12-17T22:54:15+5:30
खंबाटकी घाट : सुविधांना प्राधान्य, सुरक्षेची कामे सुरू--लोकमतचादणका
खंडाळा : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटातील तुटलेल्या संरक्षक कठड्यांची दुरुस्ती व पुन्हा उभारणीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. ‘खंबाटकी घाटातील प्रवाशांचा जीव टांगणीला’ अशा मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्तप्रसिद्धी केल्यानंतर हायवे प्रशासनाला जाग आली असून, खंबाटकी घाटातील रस्त्याच्या सुविधांना प्राधान्य देत सुरक्षाविषयक कामे सुरू केली आहेत.
खंबाटकी घाटातील अरुंद वळण रस्ते, तुटलेले संरक्षक कठडे, खचलेल्या साईडपट्ट्या, यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. त्यामुळे हा चढणीच्या घाटाचा प्रवास जीवघेणा ठरत होता. वर्षभरात आणि त्यापूर्वीही अनेक अपघातांतून शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील सुविधांबाबत हायवे प्राधिकरणाकडे अनेकदा मागणी केली होती. मात्र तेवढ्यापुरती मान डोलावून प्रशासन वेळ मारून नेत होते. घाटरस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांवर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला होता. याची दखली घेत ‘न्हाय’च्या अधिकाऱ्यांनी घाटातील संरक्षक कठड्यांची दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. तुटलेल्या कठड्यांच्या जागी लोखंडी कठडे उभे करून वाहनांची सुरक्षा करण्याबाबत उपाययोजना केली आहे. तर वळणावरील साईडपट्ट्यांचे खड्डे मुरूम टाकून मुजविण्यात आले आहेत. यामुळे वळणांवर दोन वाहनांना जाणे सोयीस्कर झाले आहे. घाटातील वळणांवर साईडपट्ट्या खचल्याने रस्ता अरुंद बनला होता. यामुळे नेहमीच येथे वाहतुकीस अडथळा येत होता. विशेषत: मोठे कंटेनर वळण घेताना अडकले जायचे. यामुळे महामार्ग वाहतूक ठप्प होत होती. (प्रतिनिधी)
खंबाटकी घाटातील तुटलेल्या संरक्षक कठड्यांमुळे प्रवास जीवघेणा बनला होता. महामार्गावर सुविधा पुरविण्यात याव्यात, यासाठी अनेकदा मागण्या झाल्या; परंतु प्रशासन डोळेझाकपणा करीत होते. ‘लोकमत’ने यावर आवाज उठविल्यानंतर आता प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ‘लोकमत’ने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
- शैलेश गाढवे, शहराध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस, खंडाळा
घाटातील काम वेगाने...
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात सध्या मुरुमाने का होईना रस्ता दुरुस्ती सुरू केल्याने वाहतूक सुरळीत होऊ लागली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून जेसीबीच्या साह्याने रस्ता भरणी व ठेकेदारांना कामगारांकडून संरक्षक ग्रील कठडे उभारणीचे काम वेगाने सुरू झाले आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकीचा प्रवास हळूहळू सुरक्षेच्या मार्गावर येत असल्याचे पाहायला मिळत असल्याचे दिसत आहे.