गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गाची डागडुजी, खड्डे भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 02:50 PM2020-08-19T14:50:52+5:302020-08-19T14:53:09+5:30
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे-बंगलोर महामार्गाच्या डागडुजीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने युद्धपातळीवर सुरू केले आहे. शेंद्रे ते नीरा पूल या दरम्यान रस्त्यावर युध्दपातळीवर खड्डे मुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे-बंगलोर महामार्गाच्या डागडुजीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने युद्धपातळीवर सुरू केले आहे. शेंद्रे ते नीरा पूल या दरम्यान रस्त्यावर युध्दपातळीवर खड्डे मुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनला सुरुवात झाली आहे. सध्या पावसाने हाहाकार माजवला आहे. महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच भर पावसामध्ये हे खड्डे भरणे जिकरीचे ठरत आहे. पाऊस उस्संत घेत नसल्याने महामार्ग प्राधिकरणाने न थांबता कामाला सुरुवात केली आहे.
गणेशोत्सव तोंडावर असल्याने मुंबई, पुणे, ठाणे या परिसरात राहणारे चाकरमानी गावाकडे परतू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी हे काम महत्त्वाचे ठरणार आहे.
महामार्ग प्राधिकरणातर्फे या कामासाठी दोन टीम तयार केल्या आहेत. हायवे पेट्रोलिंग टीमदेखील या कामामध्ये आपला हातभार लावत आहे. नीरा ते सुरुर एक टीम व दुसरी टीम शेंद्रे, सातारा परिसरात काम करत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून अखंडितपणे आता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
सर्वात पहिल्यांदा रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यात आले. त्यानंतर उड्डाण पुलांच्यावर खराब रस्ता उखडून काढण्यात आला. त्याठिकाणी नव्याने सर्व काम सील कोट पद्धतीने करण्यात येत आहे.
महामार्गावरील शिवराज पेट्रोल पंप, खिंडवाडी, अजठा चौक, देगाव फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट, वाढे फाटा, डी मार्ट च्या समोर, लिंब खिंड, रायगाव फाटा, गौरीशंकर नॉलेज सिटी, समोर नागेवाडी परिसरात हे काम सुरु आहे. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने हे काम सुरु आहे.
पावसाचा अडथळा तरीही काम
डांबरीकरणाच्या कामात पावसाचा अडथळा प्रामुख्याने येत आहे. हा अडथळा दूर करुन महामार्ग प्राधिकरणातर्फे हे काम सुरु आहे. मंगळवारी पावसाने थोडी उस्संत घेताच वेगाने काम करण्यात आले. पाऊस थांबला तर खड्ड्यांतील डांबराला कोणताही धोका पोहोचणार नाही.