महामार्गावरील बाजारपेठांना पुलांचा तडाखा!

By Admin | Published: October 17, 2016 12:54 AM2016-10-17T00:54:28+5:302016-10-17T00:54:28+5:30

परिणामाबाबत उलटसुलट चर्चा : पाचवडमधील काम अंतिम टप्प्यात; गजबज असणाऱ्या ठिकाणी दिसतो शुकशुकाट

Highway traffic bridges to the market! | महामार्गावरील बाजारपेठांना पुलांचा तडाखा!

महामार्गावरील बाजारपेठांना पुलांचा तडाखा!

googlenewsNext

महेंद्र गायकवाड ल्ल पाचवड
राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वर असणाऱ्या व नेहमी वर्दळ असणाऱ्या लिंब, आनेवाडी व उडतारे याठिकाणी असलेल्या महामार्गालगतच्या बाजारपेठा उड्डाणपुलांमुळे पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत. मुंबई व पुण्याहून ये-जा करणारे पर्यटक व वाहनचालक यांचे चहापाणी, जेवण व नाष्टा याकरिता हमखास थांबण्याचे ठिकाण म्हणून या बाजारपेठा प्रसिद्ध होत्या; परंतु या गावांच्या महामार्गावरील फाट्यांवर मोठे उड्डाणपूल झाल्याने येथील बाजारपेठांना त्याचा जबरदस्त तडाखा बसला आहे. नेहमी मोठी वर्दळ असणाऱ्या व कायम गजबजलेल्या या बाजारपेठांमध्ये आता मात्र चांगलाच शुकशुकाट पसरला आहे.
वाई तालुक्यात अग्रेसर बाजारपेठ असलेल्या पाचवडमधील उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात आलेले आहे. महामार्गाच्या दुतर्फा असणारी बाजारपेठ उड्डाणपुलांमुळे पूर्व-पश्चिम अशा दोन बाजूला विभागली जाणार आहे. महामार्गावरून प्रवास करणारे व खात्रीशीर व्यावसाय मिळवून देणारे प्रवासीच उड्डाणपुलामुळे याठिकाणी थांबणार नसल्याने येथील व्यावसायिकांची संपूर्ण भिस्त आता आजूबाजूच्या गावांमधून येणाऱ्या ग्राहकांवर राहणार आहे. लिंब, आनेवाडी व उडतारे ही वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला उत्पादनासाठी संपूर्ण जिल्ह्यात नावाजलेली गावे आहेत. ही गावे महामार्गाला जोडली गेली असून, या सर्व गावांच्या फाट्यावर निर्माण झालेल्या बाजारपेठा नुकत्याच बाळसे धरू लागल्या होत्या. लिंब फाट्याला तर गेल्या दोन-चार वर्षांपासून मोठे महत्त्व निर्माण झाले होते. कॉलेजमुळे येथील माळरानावरील जमिनींना अव्वाच्या सव्वा दर आला होता. हॉटेल्स, किराणा दुकान, स्टेशनरी व इतर व्यावसायिकांना वर्षभरापूर्वी याठिकाणी अच्छे दिन आले होते. मात्र, महामार्गाच्या सहापदरीकरणात येथे उड्डाणपूल झाला आणि लिंब फाट्यावरील बाजारपेठेची नाळच जणू तोडली गेली. अशीच स्थिती आनेवाडी व उडतारे फाट्यांची झाली आहे.
काही वर्षांपूर्वी स्थानिक नागरिकांनी या फाट्यांवर मोठ्या आशेने छोटे-मोठे उद्योगधंदे सुरू केले होते. उड्डाणपूल निर्माण होण्याअगोदर महामार्गाच्या बाजूने असणारे उद्योग चांगले तेजीत चालले होते. येथील शेतकऱ्यांचा उत्तम प्रतीचा बागायती माल महामार्गावरून ये-जा करणारे पुणे-मुंबईचे लोक हातोहात घेत होते. हॉटेल चालकांबरोबरच आॅटोमोबाईल व टायर-ट्यूबचे व्यवसायही चांगल्या पद्धतीने व्यवसाय करीत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी या गावांच्या फाट्यावरील उड्डाणपुलांची कामे पूर्ण झाली आणि येथील बाजारपेठांना अवकळा आली. पुणे-मुंबई व कोल्हापूर-सांगलीकडून येणारे पर्यटक व वाहनचालक आता या बाजारपेठांमध्ये न थांबता उड्डाणपूलांवरून पुढचा रस्ता धरत आहेत. अशा परिस्थितीमुळे अस्मानाला भिडलेले येथील जमिनीचे भाव आता कोलमडले असून, याठिकाणचे व्यावसायिक व्यवसाय मंदावल्याने हवालदिल झाले आहेत.
बाजारपेठांवर व्यावसायिकांच्या नजरा..
राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलांमुळे लिंब, आनेवाडी व उडतारे गावांच्या बाजारपेठांना तडाखा बसला असतानाच सध्या वाई तालुक्यातील पाचवड आणि भुर्इंज या महत्त्वाच्या बाजारपेठांमधील महामार्गावर उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. महामार्गावरील इतर बाजारपेठांना बसलेल्या तडाख्यामुळे पाचवडमधील प्रामुख्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. अशा या दोन्ही बाजारपेठा उड्डाणपुलांनतर
आपले अस्तित्व टिकविणार का? येथील व्यावसायिक व व्यापारी आपल्या व्यवसायांवर परिणाम होऊ नयेत, याकरिता कोणत्या उपाययोजना करणार? याबाबत
या बाजारपेठांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. असे असलेतरी बाजारपेठेवर परिणाम झाला आहे.
 

Web Title: Highway traffic bridges to the market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.