Satara: हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखला, वाहतूक संथ गतीने सुरू
By सचिन काकडे | Published: June 28, 2024 02:23 PM2024-06-28T14:23:43+5:302024-06-28T14:24:31+5:30
अर्धा तास रास्तारोको : समाजकंटकावर कारवाईची मागणी
सातारा : पुणे येथे महापुरूषाच्या पुतळ्याची एका समाजकंटकाकडून विटंबणा करण्यात आली. या घटनेचे पडसाद शुक्रवारी साताऱ्यातही उमटले. विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत पुणे-बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच जोरदार घोषणाबाजी करतानाच समाजकंटकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही केली.
ससाणेनगर (पुणे) येथे दि. १२ जून रोजी महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ कुठे रास्ता रोको तर कुठे मशाल मोर्चा काढण्यात आला. काही ठिकाणी कडकडीत बंदही पाळण्यात आला. सातारा शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी शुक्रुवारी दुपारी बारा वाजता पुणे-बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको करुन या घटनेचा निषेध नोंदविला.
महापुरुषाची विटंबणा करणाऱ्या समाकंटकाबाबत राज्य व केंद्र सरकार कोणीतही ठोस भूमिका घेत नाही. उलट असे कृत्य करणारा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे सांगून सरकार जबाबदारी झटकत असेल तर ही बाब कोणीही खपवून घेणार नाही. विटंबणा करणारी व्यक्ती कोणीही असो त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, पावसाळी अधिवेशनात याबाबत ठोस कायदा अस्तित्वात आणावा, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
या आंदोलन बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिदू एकता आंदोलन, भाजपा तसेच समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी सहभाग घेतला .आंदोलनस्थळी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भर पावसात सुमारे अर्धातास हे आंदोलन सुरू होते. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती.