हिंगणगावला भैरवनाथ यात्रा ‘फलकमुक्त’
By Admin | Published: May 5, 2016 11:36 PM2016-05-05T23:36:04+5:302016-05-06T01:16:25+5:30
आधुनिकेच्या मार्गावर : परिसरातील गावांमधून उपक्रमाचे कौतुक -- गुड न्यूज
सूर्यकांत निंबाळकर--आदर्की -यात्रा म्हटलं की, गावात उत्साही वातावरण असते. त्यातून यात्रेकरूंचे, भाविकांचे स्वागत करणारे फलक गावातील मुख्य ठिकाणी लावले जातात. चारचौघांत झळकण्याची ही एक नामी संधी असते. त्यातूनच अगदी दोन वर्षांच्या मुलापासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांचे फोटो लावण्याची स्पर्धा सुरू होते. यामुळे गावाला अवकळा येते हे जाणून हिंगणगावमध्ये फलकमुक्त यात्रा साजरी करण्याचा निर्धार केला आहे.
फलटण तालुक्यातील हिंगणगावने आजवर अनेक विक्रम प्रस्तापित केले आहे. यामध्ये गावकरी, ग्रामस्थ, तरुण मंडळ एका विचारातून अनेक वर्षांपासून तंटामुक्ती, दारूबंदी, सांस्कृतिक कार्यक्रमात टाळी, शिटी, नाचणे बंदी घातली होती. यामध्ये एक भर घालून भैरवनाथ यात्रा काळात गावात बॅनर, फ्लेक्स लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
बुरसुंडी धरणामुळे हिंगणगाव बागायती झाला आहे. पाच वर्षांनंतर निवडणुका होतात. परंतु गावात वैचारिक बैठक असल्याने प्रत्येक निर्णय भैरवनाथ मंदिरात होतात. यात्रा-जत्रांमध्ये तमाशा, आॅक्रेस्ट्रॉमध्ये नाचगाण्यांवरून भांडणतंटा होतो. त्यामुळे ग्रामस्थांनी दारूबंदी केली.
गावोगावच्या यात्रांमध्ये शिटी, टाळी, नाचणे यावर भांडणे, मारामारी होऊन सांस्कृतिक कार्यक्रम बंद पडतात. याचा विचार करून तीस वर्षांपूर्वी तमाशा, आॅकेस्ट्रॉत नाचणे, टाळी, शिटी वाजविण्यावर बंदी घातली आहे. त्यानंतर आजवर यात्रेतील सांस्कृतिक कार्यक्रम शांततेत पार पडले आहेत. ‘लोकमत’ने राबविलेल्या डॉल्बीमुक्त अभियानात गावाने सक्रिय सहभाग घेऊन डॉल्बी वाजविण्यावर बंदी घातली आहे.
वाहतूक सुरळीत
गावात बॅनर युद्ध, फ्लेक्स बोर्ड यामुळे चौकाचौकांत फलकांची गर्दी होते. फलक लावण्यावरून तरुणांमध्ये वादावादीचे प्रकार घडतात. तसेच रस्ता अडविला गेल्याने वाहतूक विस्कळीत होते. मात्र, फलक बंदी घातल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून फ्लेक्सबंदी निर्णयाचे स्वागत होत आहे.
हिंगणगावमध्ये फलकबंदी घातली असल्याने वेशीसमोरचा रस्त्याने खुला श्वास घेतला आहे.