हिंगणी शाळेत ३६५ दिवस शिक्षण !

By admin | Published: June 29, 2016 10:46 PM2016-06-29T22:46:35+5:302016-06-30T00:05:24+5:30

शारीरिक-बौद्धिक खेळ : सत्तर उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर-- अशी ही जगावेगळी शाळा

Hingani school teaches 365 days! | हिंगणी शाळेत ३६५ दिवस शिक्षण !

हिंगणी शाळेत ३६५ दिवस शिक्षण !

Next

सचिन मंगरूळे -म्हसवड  -सातारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर व सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या हिंगणी, ता. माण येथील जिल्हा परिषद शाळेत ३६५ दिवस शिक्षण दिले जाते. हा उपक्रम राबविणारी ही राज्यातील दुसरी तर जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व शाळेची गोडी निर्माण होण्यासाठी विविध ७० उपक्रम शाळेत राबविले जातात.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा असतो तो शाळेचा. विशेषत: प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामध्ये सर्वसामान्यांच्या व ग्रामीण भागातील हक्काच्या जिल्हा परिषद शाळांना अत्यंत महत्त्व आहे. काही वर्षांत खासगी शाळांच्या अतिक्रमणात जिल्हा परिषद शाळांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. मात्र लोकसहभागाच्या माध्यमातून प्रयोगशील शिक्षकांनी शाळांचे रूपडे पालटवले. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच इतर उपक्रमातून सर्वगुणसंपन्न पिढी घडवण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.
सध्या महाराष्ट्रात ‘३६५ दिवस शाळा’ हा उपक्रम चालवणारी पुणे जिल्ह्यातील कडिर्लेवाडी पहिली तर माण तालुक्यातील हिंगणीची दुसरी शाळा आहे. विद्यार्थ्यांना लाठी-काठी, कराटे, अ‍ॅप्सच्या साह्याने इंग्रजी स्पिकिंग कोर्स, मनोरंजक खेळ, संगणक प्रशिक्षण, बचत बँक, वर्ग सजावट, वाद्यांग, डिजिटल क्लासरूम, सर्व अद्ययावत रेकॉर्ड, विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी सामान्यज्ञान वाढण्यासाठी शाळेत वर्तमानपत्र सुरू केले आहे. शाळेत विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे होतात. वाढदिवसाला शाळेला पुस्तके भेट दिली जातात.


पगारातील तीन टक्के वाटा शाळेसाठी
शिक्षक वार्षिक पगाराच्या तीन टक्के खर्च शाळेसाठी करतात. ज्ञानरचनावादावर आधारित अध्ययन व अध्यापन, पाढे पाठांतर यांसह ७० उपक्रम या शाळेत राबविले जातात. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिले जाते तर येथील विद्यार्थी संख्या ११२ आहे. या ठिकाणी सर्व सण, राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात. आपली शाळा इतरांपेक्षा वेगळी असावी, यासाठी शालेय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मुलाणी, सरपंच नितीन घुटुगडे यांच्यासह सर्व ग्रामस्थांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. शाळेसाठी आपणही काहीतरी केले पाहिजे, या भावनेतून ग्रामस्थ आर्थिक मदत करत असतात.

शालेय ज्ञानाबरोबरच त्यांच्यात खिलाडूवृत्ती वाढावी यासाठी व स्वसंरक्षण होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी, यासाठी शाळेत विविध ७० उपक्रम राबवितो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण होऊन विद्यार्थ्यांची गळती थांबली आहे.
- विजयकुमार काळे, शिक्षक जि. प. शाळा, हिंगणी

Web Title: Hingani school teaches 365 days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.