साताऱ्यातील प्रवेशद्वारावर उभारणार इतिहास जागविणाऱ्या कमानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:54 AM2021-02-26T04:54:21+5:302021-02-26T04:54:21+5:30
सातारा : सातारा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला असून, हा वारसा जतन करणे गरजेचे आहे. यासाठी शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे सुशोभीकरण ...
सातारा : सातारा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला असून, हा वारसा जतन करणे गरजेचे आहे. यासाठी शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे सुशोभीकरण करण्यासाठी शहराला जोडणाऱ्या प्रमुख प्रवेशद्वारांवर भव्य-दिव्य कमानी उभारण्याचे पालिका प्रशासनाचे नियोजन आहे. या कमानी शहराच्या वैभवात भर घालण्याबरोबरच इतिहास जागविण्याचे काम करतील, असा विश्वास पालिकेत झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी अकरा वाजता नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीत कल्पनाराजे यांनी विविध विकासकामांचा आढावा जाणून घेतला. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, बांधकाम सभापती सिद्धी पवार, रजनी जेधे, संगीता आवळे आदी उपस्थित होते.
राजमाता कल्पनाराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून सातारा शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे सुशोभीकरण केले जाणार आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी नाशिकहून आलेले फायबर वर्क एक्सपर्ट संजीव खत्री यांच्या शिष्टमंडळाने नियोजित कामांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा केली. ऐतिहासिक वास्तू कशी असावी, त्याच्या सुशोभीकरणासाठी वापरले जाणारे साहित्य कसे असावे, याचे सादरीकरण संगणाकाद्वारे करण्यात आले. सुशोभीकरण अॅडव्हान्स फायबर वर्कमध्ये असणार आहे. हे साहित्य अत्यंत टिकाऊ, मजबूत असते. त्यावर हवामान, पाऊस व पाण्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचे संजीव खत्री यांनी सांगितले.
दरम्यान, शहराला जोडणाऱ्या प्रमुख प्रवेशद्वारांवर भव्य-दिव्य व इतिहास जागविणाऱ्या कमानी उभारणार असल्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंंतर शहरातील गोल बाग, कमानी हौद, ग्रेड सेपरेटर, पोवई नाका शिवतीर्थ, सातारा पालिकेची नियोजित प्रशासकीय इमारत, गोडोली तळे आदींची कल्पनाराजे भोसले यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक किशोर शिंदे, मुख्याधिकारी अभिजित बापट, नगर अभियंता दिलीप चिद्रे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
फोटो : २५ पालिका बैठक
सातारा पालिकेत गुरुवारी राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील ऐतिहासिक वास्तू कशा असाव्यात, याचे सादरीकरण करण्यात आले.